मुंबई – उच्च न्यायालयात उद्धव ठाकरे यांच्या गटाला शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मिळाल्यानंतर आता ठाकरे गटाकडून मेळाव्यासाठी जोरदार तयारी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील बीकेसी येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत.
मुंबईतल्या छत्रपती शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा होणार आहे. यासाठी मुंबईतून प्रत्येक शाखेतून चार बसेस निघणार आहेत. मुंबईत एकूण 227 शाखा आहे, म्हणजे एकूण 908 बस या मुंबईतल्याच असणार आहेत. मुंबईतून ठाकरेंना यंदा 50 हजारपेक्षा जास्त गर्दी अपेक्षित आहे. त्यासाठी मुंबईतल्या विभागप्रमुखांनी आपली ताकद पणाला लावली आहे.
दरम्यान, मुंबईतील बीकेसी मैदनावर शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. शिंदे गटातील सर्व आमदारांना आपल्या मतदारसंघातून मोठया प्रमाणात सभेसाठी कार्यकर्त्यांना घेऊन येण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एकट्या अब्दुल सत्तार यांनी आपल्या मतदारसंघासाठी 300 एसटी बुक केल्याची माहिती आहे. तर शिंदे गटातील आमदारांकडून जवळपास 4 हजार 500 गाड्यांची मागणी महामंडळाकडे केल्याची माहिती समोर आली आहे. बीकेसी मैदानावर एक लाख कार्यकर्ते बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दहा हजार गाड्यांची पार्किंगची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.