यशस्वीची ‘यशस्वी’ कामगिरी

2019’च्या आयपीएलसाठी नुकताच खेळाडूंचा लिलाव करण्यात आला. या लिलावात दिग्गज अनुभवी खेळाडूंइतकीच युवा भारतीय खेळाडूंनीही भरारी घेतली. यावर्षी अनेक युवा खेळाडूंना आयपीएल संघांनी पसंती दिली या युवा खेळाडूंमध्ये सर्वांचे लक्ष वेधले ते यशस्वी जैस्वाल या अवघ्या 17 वर्षाच्या खेळाडूने.

राजस्थान रॉयल्स संघाने त्याला तब्बल 2 कोटी चाळीस लाख रुपये मोजून आपल्या संघात स्थान दिले. त्याची बेसप्राईस होती अवघी वीस लाख म्हणजे त्याचा बेस प्राईस पेक्षा बारा पट जास्त रक्कम त्याला मिळाली. म्हणूनच तो नावाप्रमाणेच या लिलावातील सर्वात यशस्वी खेळाडू ठरला आहे.

यशस्वीचा आजवरचा प्रवास थक्क करणारा आहे. आज करोडपती असणारा यशस्वी एकेकाळी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी मुंबईत पाणी पुरी विकायचा. यशस्वी मूळचा उत्तरप्रदेश मधील भधोही या गावचा आहे. तिथे त्याच्या वडिलांचे एक छोटेसे दुकान आहे. दोन भावात यशस्वी सर्वात लहान. यशस्वीला लहानपणापासूनच क्रिकेट खेळण्याची हौस होती. रोहित शर्मा, विराट कोहली यांच्याप्रमाणेच आपणही यशस्वी क्रिकेटपटू होऊ हे स्वप्न घेऊन तो वयाच्या 11 व्या वर्षी मुंबईत त्याच्या काकांकडे आला. काकांचे घरही छोटे म्हणून काकांनी मुस्लिम युनायटेड क्‍लबला विनंती केली की यशस्वीला तेथील टेंट मध्ये राहू द्यावे. जवळजवळ तीन वर्ष तो या टेंटमध्ये राहिला. तिथे त्याला अनेकदा उपाशी झोपावे लागले. पण त्याने परिस्थितीशी हार मानली नाही. घरुन येणारे पैसे तो क्रिकेटच्या प्रशिक्षणासाठी खर्च करीत होता. तर स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी तो आझाद मैदानावर पाणीपुरी विकत होता. ज्या आझाद मैदानावर तो दिवसभर क्रिकेटचा सराव करायचा त्याच आझाद मैदानावर तो संध्याकाळी पाणीपुरी विकायचा. हे सर्व तो करायचा ते केवळ क्रिकेटसाठी. त्याच्या या मेहनतीला अखेर यश मिळाले. विजय हजारे चषक स्पर्धेत त्याने धुवाधार द्विशतक ठोकले. त्याच्या या खेळीने त्याला भारतीय संघाचे दार उघडून दिले.

भारताच्या सतरा वर्षाखालील संघात त्याची निवड झाली. त्याच्याच अप्रतिम कामगिरीमुळे या संघाने आशिया कप जिंकला. या स्पर्धेत त्याला सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळाला. आता पुढील वर्षी होणाऱ्या अंडर 19 विश्वचषक स्पर्धेतील भारतीय संघातही त्याला स्थान मिळाले आहे. त्याची ही कामगिरी थक्क करणारी आहे. यशस्वीची ही यशस्वी कामगिरी खरोखरच प्रेरणादायी आहे. परिस्थिती कितीही विपरीत असेल तरी जिद्द, चिकाटी आणि मेहनत करुन त्यावर मात करता येते हे यशस्वीने दाखवून दिले आहे.

-श्‍याम बसप्पा ठाणेदार

Leave A Reply

Your email address will not be published.