रिसॅट 2 बी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा – पृथ्वीरील वातावरण आणि अन्य भौगोलिक स्थितीचे निरीक्षण करण्यासाठी भारतीय अंतरीक्ष संशोधन संस्था म्हणजेच इस्त्रो तर्फे तयार करण्यात आलेल्या रिसॅट-2बी उपग्रहाचे आज अंतरीक्षात यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्ही – सी 46 या यानाद्वारे या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. गेल्या मंगळवार पासून यानाचे 25 तासांचे काऊंटडाऊन सुरू होते. ते पुर्ण होताच हे यान उपग्रहासह अंतरीक्षात झेपावले. सतीश धवन अंतरीक्ष प्रक्षेपण स्थळावरून झालेले हे यशस्वी उड्डाण होते. या उपग्रहाचे वजन 615 किलो इतके आहे.

हा उपग्रह रडार इमेजींग पद्धतीचा उपग्रह आहे.कृषी, वन, आपत्ती निवारण आणि सर्व्हेलन्स इत्यादी कामासाठी हा उपग्रह उपयोगी पडणार आहे. पृथ्वीपासून 555 किमी अंतरावरील कक्षेत तो प्रक्षेपित करण्यात आला आहे. पीएसएलव्ही हे यान इस्त्रोचे सर्वात यशस्वी यान ठरले असून या यानाने आत्तापर्यंत 354 उपग्रह अंतरिक्षात प्रक्षेपित केले आहेत अशी माहिती इस्त्रोचे मिशन प्रमुख के सिवान यांनी पत्रकारांना दिली.

ते म्हणाले की या उपग्रहात अत्यंत आधुनिक प्रणालीची यंत्रणा आणि ऍन्टेना बसवण्यात आली असून त्याचा उपयोग अन्य अंतरीक्ष मोहीमांसाठीही होणार आहे. त्यामुळे इस्त्रोसाठी ही मोहीम अत्यंत महत्वाची होती. ती यशस्वीपणे पार पडल्याचे आम्हाला समाधान आहे. 9 जुलैपासून भारताची चांद्रयान 2 मोहीम सुरू होणार असून त्यापुर्वीची आमची ही एक महत्वाची मोहीम होती असे ते म्हणाले. भारताने सन 2009 मध्ये रिसॅट 2 हा उपग्रह सोडला होता. त्याची कार्यक्षमता आता संपल्यामुळे त्याची जागा हा नवीन उपग्रह घेणार आहे असेही सिवान यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.