नवी दिल्ली – इस्त्रोच्या जीसॅट 30 उपग्रहाचे फ्रेंच गयाना येथून आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. चालू 2020 वर्षातील इस्त्रोचा अंतरिक्षात प्रक्षेपित झालेला हा पहिलाच उपग्रह आहे. एरेन 5 या अंतरीक्ष प्रक्षेपण यानांतून या उपग्रहाचे आज सकाळी भारतीय प्रमाण वेळेनुसार 2 वाजून 35 मिनीटांनी प्रक्षेपण झाले. उड्डाणानंतर 38 व्या मिनीटांत हा उपग्रह आपल्या नियोजित कक्षेत सोडण्यात आला.
प्रक्षेपणानंतर 38 मिनिटे आणि 25 सेकंदानी जीसॅट-30 हा उपग्रह, उपग्रह यानापासून अलग झाला. त्यानंतर लगेचच इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या कर्नाटकमधल्या हसन इथल्या मास्टर कंट्रोल फॅसिलिटीने त्याचे नियंत्रण घेतले. 3357 किलोग्रॅम वजनाचा हा उपग्रह कक्षेतल्या काही उपग्रहांच्या कार्यात्मक सेवांना अखंडता पुरवणार आहे. इनसॅट-4ची जागा जीसॅट-30 घेणार आहे, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवान यांनी दिली.
जीसॅट 30 हा 3357 किलो वजनाचा उपग्रह असून तो इनसॅट 4 ए उपग्रहाची जागा घेणार आहे. भारताची मुख्य भूमी आणि भारतीय बेटांवर दळणवळणासाठी हा उपग्रह उपयुक्त ठरणार आहे. तसेच या उपग्रहाच्या सी बॅन्ड द्वारे आखाती देशांना संपर्काची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अन्य अशियाई देश आणि ऑस्ट्रेलिया या देशांनाही याचा संपर्कासाठी उपयोग करून घेता येणार आहे.
व्हीसॅट नेटवर्कसाठी सपोर्टिग सिस्टीम म्हणूनही या उपग्रहाचा वापर करून घेता येणार आहे. तसेच टेलिव्हीजन अपलिंकिंग, डिजीटल सॅटेलाईट सेवा, टेलिपोर्ट सर्व्हिस, डीटीएस टेलिव्हीजन सेवा इत्यादी सेवांसाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. या उड्डाणानंतर दिलेल्या संदेशात इस्त्रोचे अध्यक्ष के सिवान यांनी म्हटले आहे की या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले असून तो आता ईन्सॅट 4 ए उपग्रहाची जागा घेणार असून त्यामुळे कम्युनिकेशनसाठीच्या अनेक सेवांसाठी त्याचा उपयोग होणार आहे. भारताच्या मुख्य भूमीसाठी केयु- बॅंडची सेवाही उपलब्ध होणार आहे. फ्रेंच गयानाच्या अंतरीक्ष प्रक्षेपण स्थळावरून युरोपियन स्पेस एजन्सीने या आधी भारताच्या जीसॅट 31 उपग्रहाचे प्रक्षेपण केले होते.