पिंपळे गुरव – जन्मतःच अंध असलेल्या दीपक नवनाथ गाजरे याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत स्पर्धा परीक्षा देऊन लिपिक पदवी मिळविली. त्याने मिळविलेल्या यशामुळे पिंपळे गुरव परिसरातील नागरिक, स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असलेल्या विद्यार्थ्यांमधून कौतुक होत आहे.
दीपकचे मूळ गाव सोलापूर जिल्ह्यातील भंडीशेगाव आहे. ग्रामीण भागात जन्म झालेला आणि जन्मतःच अंध असल्याने गावातील नागरिक, पाहुणे हे सर्व हा या जन्मात काय करणार असा प्रश्न होता. परंतु दीपकने नावाप्रमाणेच आपल्या अंतःकरणातील जिज्ञासू वृत्तीचा दीपक कधीच विजू दिला नाही.
आपल्या शारीरिक व्यंगावर मात करत जिद्दीने शाळेत प्रवेश घेऊन प्राथमिक, माध्यमिक शिक्षण गावी घेतले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षण नगर येथे घेतले. परंतु शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षा देऊन एखादी पोस्ट मिळवावी, अशी मनाशी खुणगाठ बांधली.परंतु स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना पुस्तकांची अडचण येत होती. अंध असल्याने ब्रेल लिपीमध्ये पुस्तके मोठ्या प्रमाणावर उपलब्ध नव्हती. त्यामुळे अभ्यास करताना त्याला अडचण येत होती.
परंतु त्याने यावरदेखील शिक्षक, मित्र यांच्या मार्गदर्शनाने यशस्वी मात केली. त्याने स्पर्धा परीक्षेसंबंधी ऑडिओ लेक्चर मोबाइलच्या माध्यमातून ऐकून स्पर्धा परीक्षेची तयारी केली. 2018 मध्ये परीक्षा दिली परंतु अपयश आले. त्या अपयशाने खचून न जाता त्याने मोठ्या जिद्दीने प्रयत्न सुरू ठेवले. 2020 मध्ये त्याच्या प्रयत्नांना यश आले आणि एमपीसीमार्फत घेतलेली लिपिक परीक्षा तो उत्तीर्ण झाला. अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात केल्याने त्याचे मोठे कौतुक होत आहे.
त्याची जिद्द पाहून मोलमजुरी करून जगणाऱ्या आईवडिलांनी कर्ज काढून त्याला पुण्याला शिक्षणासाठी पाठविले. त्याने देखील परिस्थितीची जाणीव ठेवून अभ्यास केला आपल्या शारीरिक व्यंगाचे भांडवल न करता प्रयत्नाने यश संपादन केले. दीपकने आपल्या यशामागे आपले आईवडील, मित्र तसेच शिक्षक, मार्गदर्शक यांचे मोलाचे सहकार्य असल्याची भावना व्यक्त केली.