कोल्हापूर – करोना महामारीचा सर्वांनाच फटक बसला आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. तर अनेकांच्या हातातील काम गेलं. तर अनेकजण नोकऱ्या नसल्यामुळे बेरोजगार आहेत. मात्र कोल्हापुरातील महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीने घेतलेली गरूडझेप चर्चेचा विषय ठरली. आधी कोडींगमध्ये दाखवलेलं कौशल्य, इंटर्नशीपमध्ये कामाची दाखवलेली चूनूक आणि आता थेट 41 लाख रुपये वार्षिक पॅकेजला या युवतीने गवसणी घातली.
कोल्हापूरमधील या युवतीचं नाव अमृता कारंडे आहे. 21 वर्षीय अमृता कोल्हापूर इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात केआयटीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियरिंगच्या अखेरच्या वर्षात शिकत आहे. अमेरिकेतील आघाडीची कंपनी असलेल्या ‘अडॉब’ या कंपनीने अमृताला नोकरीसाठीचं ऑफर लेटर दिलं आहे.
अमृता एका सर्वसामान्य कुटुंबातील युवती असून तिचे वडील विजयकुमार हे रिक्षाचालक आहेत. तर आई गृहिणी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अडॉबने आयोजित केलेल्या सी कोडींग स्पर्धेत अमृताने सहभाग घेतला होता. त्यात तिला पहिला क्रमांक मिळाला होता. त्यानंतर कंपनीकडून अमृताला अडीच महिन्यांची इंटर्नशीप कऱण्याची संधी देण्यात आली. यासाठी कंपनीने अमृताला 1 लाख रुपये प्रतिमहिना स्कॉलरशीप देखील दिली.
दरम्यान इंटर्नशीपच्या कालावधीत कंपनीकडून अमृताच्या अनेक चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांमध्ये तिने उत्तम कामगिरी केली. त्यानंतर कंपनीने अमृताला थेट 41 लाख रुपये पॅकेजची नोकरी ऑफर केली. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना एवढ्या मोठ्या पॅकेजची नोकरी मिळणे ही दुर्मिळ घटना असल्याचं केआयटीचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी यांनी नमूद केलं.
या यशानंतर अमृता म्हणाली की, माझ्या शिक्षणासाठी माझ्या पालकांनी फार कष्ट घेतले आहेत. त्यांच्या या कष्टाचं चीज झाल्याचं आपल्याला समाधान आहे. मला भारतातील माहिती तंत्रज्ञान आणि सॉफ्टवेअर क्षेत्रामध्ये संशोधन करण्याची इच्छा असल्याचं अमृताने म्हटलं आहे.