Success story । आज आपण लहान मुलांना ‘मछली जल कि राणी है ‘ हे गाणं शिकवतो. पण हीच राणी मच्छिमारांच्या आयुष्यात कधी कधी नवी उभारी घेऊन येते. या मासेमारी व्यवसायाची खास गोष्ट म्हणजे त्यावर पुरुषांचे वर्चस्व नाही. या व्यवसायात महिलांचा वरचष्मा आहे आणि त्या या व्यवसायाच्या खऱ्या ‘राण्या’ आहेत. अशाच एका राणीची योशोगाथा आज आपण जाणून घेऊ…अलिबागमधील मासळी व्यापारी नलिनी पांडुरंग मुंबईकर यांनी मासेमारी व्यवसायात स्वतःला कसे सिद्ध केले? आलेल्या संकटांवर मात कशी केली याची माहिती घेऊ…
नलिनी पांडुरंग मुंबईकर या १२ वर्षांच्या असतानाच मासेमारीचा व्यवसाय शिकला. आज ती एका हॉटेलची मालकिन आहे. माशांसोबतच त्या मसाल्यांचाही व्यवसाय करतात. स्वतः नफा मिळवण्यासोबतच त्यांनी अनेक महिलांना रोजगारही दिला आहे.
१२ वर्षात मासेमारीचा व्यवसाय शिकल्या Success story ।
नलिनी अलिबागच्या रहिवाशी आहेत. मासेमारी हा याठिकाणचा रोजगाराचा सर्वात मोठा स्रोत आहे. त्या १२ वर्षांचा असताना त्यांच्या आईने या जगाचा निरोप घेतला. नलिनी तेव्हा सातवीत शिकत होत्या. आईनंतर, कुटुंबात आम्ही फक्त तिघेच उरलो – वडील, धाकटा भाऊ आणि नलिनी. वडील समुद्रात मासेमारीचे काम करायचे. माझ्या धाकट्या भावाची काळजी घेण्यासाठी घरी कोणी नव्हते, म्हणून नलिनी यांना आपली शाळा सोडावी लागली.
आई गेल्यानंतर नलिनी यांना त्यांच्यावर आलेल्या जबाबदारीमुळे वयापेक्षा मोठं झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर घराची आणि भावाची काळजी घेण्यासोबतच, त्यांनी कुटुंबाला आधार देण्यासाठी वडिलांसोबत मासेमारीत मदत करण्यासाठी जाऊ लागल्या. त्या वयात त्यांना घरची जबाबदारी सांभाळायची होती पण घरच्यांना दोन घास खाऊ घालण्यासाठी स्वयंपाक देखील त्यांना येत नव्हता. तेंव्हा त्यांनी यावर तोडगा काढण्यासाठी शेजारच्यांकडून स्वयंपाक शिकून घेतला. त्यांनतर मासेमारी आणि घर अशी कसरत सुरु झाली.
लग्नानंतर नवीन संघर्ष सुरू झाला
दरम्यान , काही दिवसानंतर नलिनी यांचा विवाह झाला. माहेरसारखीच सासरीदेखील आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. त्यात कुटुंबाचा आकार देखील मोठा होता. अर्थात लग्नानंतर १२ लोकांसाठी जेवण बनवण्याची जबाबदारी नलिनी यांच्यावर आली. हे सर्व सुरु असताना नलिनी या दोन मुलांची आई बनल्या तेव्हा त्यांच्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचे ओझे आणखी वाढले.
दरम्यान, मुलांच्या जन्मानंतर नलिनी यांच्या पतीला बँकेत नोकरी मिळाली. पण हा आनंदही फार काळ टिकला नाही. माझ्या पतीची बँक बंद पडली तेव्हा आमची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे कोलमडली होती. पतीची नोकरी गेल्यानंतर, नलिनी यांनी पुन्हा एकदा मासेमारीचा व्यवसाय सुरू केला. मुलांना आजीकडे सोडून सकाळी पाच वाजता पतीसोबत मासेमारीला त्या जायच्या आणि नंतर बाजारात मासे विकायच्या. माशांचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि घराची आर्थिक परिस्थितीही सुधारू लागली.
कोळी रेसिपीने त्या प्रसिद्ध झाल्या
नलिनी स्वतः अभ्यास करू शकल्या नाहीत, पण दोन्ही मुलांच्या शिक्षणात त्यांनी कोणतीही कमतरता येऊ दिली नाही. शिक्षणानंतर, मोठा मुलगा आमच्यासोबत मासेमारीचा व्यवसायाला हातभार लावतो. तर धाकटा मुलगा सिव्हिल इंजिनिअर आहे आणि तो सिनेमॅटोग्राफी करतो. दोन्ही मुलांचा व्यवसायात पूर्ण पाठिंबा आहे.
लॉकडाऊन दरम्यान एके दिवशी नलिनी यांच्या धाकट्या मुलाने त्यांच्या स्वयंपाकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला. लोकांना तो इतका आवडला की एका दिवसात या व्हिडिओला २० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. लोकांनी आणखी व्हिडिओ बनवण्याची मागणी केल्यानंतर त्यांनी मुलासोबत मिळून अनेक व्हिडिओ बनवले. मी बनवलेली कोळीची रेसिपी लोकांना खूप आवडू लागली.
अशा प्रकारे सुरू झाला मसाल्यांचा व्यवसाय
दरम्यान, रेसिपीचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी त्यांच्या मासल्याविषयी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी घरगुती मसाले लोकांपर्यंत पोहोचावेत यासाठी गावातील महिलांना एकत्र केले आणि मसाल्यांचा व्यवसाय सुरू केला. मसाल्याच्या व्यवसायाचे दोन फायदे होते – लोकांना त्यांच्या आवडीचे मसाले मिळत होते आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या महिलांना रोजगार मिळत होता. काही काळानंतर त्यांनी गावात एक मसाल्यांचे दुकानही उघडले. या दुकानात रस्त्यावर वस्तू विकणाऱ्या गावातील महिलांचे घरगुती उत्पादने देखील त्यांनी ठेवण्यास सुरुवात केली यामुळे गावातील महिलांना घरी लोणचे, पापड, बडिया इत्यादी बनवण्यास प्रोत्साहन मिळते आणि चांगले उत्पन्न देखील मिळण्यास सुरुवात केली.
हळूहळू त्या सोशल मीडियावर इतक्या प्रसिद्ध झाल्या की बाजारात मासे विकण्यात अडथळे निर्माण होऊ लागले. लोक कामाच्या वेळेत वेळेत फोटो व्हिडीओ शूट करायचे. त्यामुळे कामात व्यत्यय येऊ नये म्हणून मी बाजारात मासे विकणे बंद केले. आता बाजारात मासे विकण्याऐवजी त्यांनी ऑनलाइन सुके मासे विक्री करण्यास सुरुवात केली.
आता नलिनी यांचे मसाले परदेशातही निर्यात केले जात आहेत. सोशल मीडियावरून मिळणाऱ्या उत्पन्नाचा वाटा नलिनी दान करतात. सोशल मीडियावर अनेक लोक कोळीच्या रेसिपीची मागणी करायचे. त्यातून त्यांना हॉटेल व्यवसाय करण्याची कल्पना सुचली. त्यातून त्यांनी आमच्या ‘कॉलिनबे’ नावाचे हॉटेल सुरु केले. यामध्ये फक्त महिलाच जेवण बनवतात. याठिकाणी अस्सल कोळी पदार्थ बनवले जातात.
नलिनी यांना आयुष्यात इतके यश मिळेल असे कधीच स्वप्नात देखील वाटले नव्हते असे एका मुलाखतीत म्हटले होते. सध्या, अलिबागमधील सुमारे २५०-३०० महिला नलिनी यांच्यासोबत काम करत आहेत. सामान्य घरातील महिलांना रोजगार देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हेच खरे ‘महिला सक्षमीकरण’ आहे. यामुळे प्रत्येक घराचा आणि संपूर्ण देशाचा विकास होईल असे देखील नलिनी यांनी सांगितले. दरम्यान , आयुष्यात कोणत्याही वळणावर संकट येऊ देत त्यावर तेवढ्याच धाडसाने सामोरे जाण्याची जिद्द आपल्याला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवते हे नलिनी मुंबईकर यांच्याकडे म्हणावे लागेल.