Success Story । कोणतेही काम उत्तम तयारीने केले तर ते यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. असेच काहीसे एका व्यक्तीने केले आहे ज्याने छोट्याशा नोकरीपासून सुरुवात करून आज हजारो कोटींची कंपनी उभी केलीय. आजच्या Success Story मध्ये आपण अशाच कष्टातून पुढे आलेल्या बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक चंदूभाई विराणी यांच्या अथक परिश्रमाचा प्रवास जाणून घेणार आहोत…
चंदूभाई विराणी यांचा जन्म गुजरातमधील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांनी शून्यातून करोडो रुपयांची कंपनी उभी केलीय. देशभरात आपला व्यवसाय वाढवला. त्याचा प्रवास खूपच आव्हानात्मक होता. त्यांनी राजकोटमध्ये 20,000 रुपयांपासून कृषी उत्पादने आणि कृषी उपकरणांचा व्यवसाय सुरू केला. परंतु हा व्यवसाय जास्त काळ चालू राहू शकला नाही आणि 2 वर्षांतच यांचा हा व्यवसाय बॅड पडला. त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब आर्थिक संकटात सापडलं होतं.
1000 रुपयांची नोकरी केली Success Story ।
दरम्यान, कुटुंबाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी चंदूभाईंनी प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी लहानमोठ्या नोकऱ्याही केल्या. ॲस्ट्रॉन नावाच्या सिनेमा हॉलमध्ये त्यांनी सीट दुरुस्तीचं काम केलं. याशिवाय कंपनीचे पोस्टर चिकटवणे, थिएटरमध्ये स्नॅक्स विकणे अशी अनेक कामे त्यांनी केली. यासाठी त्याला दरमहा एक हजार रुपये मिळत होते. चंदूभाई विराणी या नोकरीवर खूश नव्हते आणि आता स्वतःचे काहीतरी सुरू करण्याची त्यांची मनोमन इच्छा होती.
पुन्हा व्यवसाय सुरू केला
मग काय त्यांनी लोकांची मागणी समजून घेतली. यावेळी पूर्ण तयारीनिशी चंदूभाईंनी पुन्हा एकदा व्यवसाय करण्याची जोखीम पत्करली. त्यांनी त्यांच्या घरात तात्पुरते शेड बांधले. 10,000 रुपयांच्या नाममात्र गुंतवणुकीने चिप्सचा व्यवसाय सुरू केला. या होम मेड चिप्सचे थिएटरच्या आत आणि बाहेर लोकांनी खूप कौतुक केले.
अशा प्रकारे कंपनीचा पाया रचला गेला
या यशानंतर चंदूभाईंनी आणखी मोठी उडी घेण्याचं ठरवलं. त्यानुसार त्यांनी 1982 मध्ये बँकेकडून दीड लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्यातून त्यांनी पहिला कारखाना सुरू करण्याची तयारी केली. आजी GIDC, राजकोट येथे गुजरातमधील सर्वात मोठा बटाटा वेफर कारखाना सुरू करताना त्यांनी बँकेकडून एकूण 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर चंदूभाई आणि त्यांच्या भावांनी 1992 मध्ये बालाजी वेफर्स प्रायव्हेट लिमिटेडची स्थापना केली. कंपनीने 6.5 दशलक्ष किलोग्रॅम बटाटे आणि 10 दशलक्ष किलोग्राम नमकीन या दैनिक उत्पादन क्षमतेसह सुरुवात केली. आणि बघता-बघता त्यांचा व्यवसाय यशाची शिखरं गाठत गेला.
5000 कोटी रुपयांची उलाढाल Success Story ।
सध्या, चंदूभाई विराणीची बालाजी वेफर्स ही एक मोठी कंपनी बनलीय. ज्याची भारतातील 43,800 कोटी रुपयांच्या स्नॅक्स मार्केटमध्ये 12 टक्के वाटा आहे. ही भारतातील तिसरी स्नॅक्स विक्रेता कंपनी आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये कंपनीची उलाढाल 5000 कोटी रुपये होती. या कंपनीत 7000 कर्मचारी काम करतात, त्यापैकी 50 टक्के महिला आहेत. ही कंपनी दर तासाला ३,४०० किलो चिप्स तयार करते.
दरम्यान, आयुष्यात आलेल्या अपयशाला जास्त कुरवाळत न बसता चंदुभाई यांनी आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केला. त्यातूनच आज बालाजी वेफर्स घराघरांमध्ये पोहचले आहेत. त्यामुळं इच्छित ध्येय गाठण्यासाठी चंदुभाई हे इतरांसाठी नक्कीच प्रेरणा देणारे ठरतात.