यशोगाथा माणदेशी महिलांची: पीपीई कीट व मास्कनिर्मितीतून सावरले अनेकींचे संसार…

श्रीकांत कात्रे

माणदेशी फाउंडेशन व माणदेशी महिला सहकारी बॅंक या दोन्ही संस्था फक्त माणदेशापुरत्या सीमित राहिल्या नाहीत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील महिलांच्या स्वालंबनासाठी काम सुरू झाले. पुण्यातील शाखांद्वारे परिसरातील महिलांचाही या दोन्ही संस्था आधार बनू लागल्या. करोना संकटकाळातही फाउंडेशनच्या को- ऑर्डिनेटर अनिता साळवी यांच्या प्रयत्नांतून महिलांच्या जगण्याला हातभार लागला….

 

शिवणकामाचे प्रशिक्षण देणाऱ्या आणि माणदेशी फाउंडेशनच्या पुण्यातील को- ऑर्डिनेटर असणाऱ्या अनिता साळवी यांनी महिलांकडून मास्क व पीपीई कीट तयार करून घेतले. त्यातून अनेक महिलांच्या संसाराला हातभार लागला. लॉकडाऊनच्या काळात महिलांच्या जगण्याला या उपक्रमामुळे वेगळी दिशा मिळाली.

“माणदेशी’च्या धायरी व भोसरी येथील शाखांच्या को- ऑर्डिनेटर म्हणून अनिता साळवी सध्या काम पाहत आहेत. माणदेशी’मध्ये येण्यापूर्वी त्यांनी वेगवेगळ्या संस्थांमधून व्यवसाय प्रशिक्षिका म्हणून काम केले. शिवणाबरोबरच राखी बनविणे, रांगोळी, मेंदी, ज्वेलरी, पाककृती (चायनीज राइस), बागकाम, मेकअप, हेअर स्टाइल अशा विविध विषयांच्या त्या प्रशिक्षण द्यायच्या. धायरीमध्ये माणदेशी बॅंकेची शाखा सुरू झाली. माणदेशी फाउंडेशनचे काम सुरू झाले. इथे नवीन काय आहे, हे पाहण्यासाठी अनिताताई तिथे गेल्या. नंतर फाउंडेशनच्याच होऊन गेल्या. प्रशिक्षण उपक्रमात ट्रेनर म्हणून काम करण्याची संधी त्यांना 2014 पासून मिळाली. माणदेशी’कडे आल्यावर खूप काही शिकायला मिळाले, वेगळे काही करण्याची संधी मिळाली, इथे काम करताना भेटलेल्या महिलांकडूनही काही शिकायला मिळाले, त्यामुळे माझ्या स्वतःमध्येही बदल होत गेला, असे अनिता साळवी यांनी सांगितले. माणदेशी’मुळे येरवडा कारागृहातील महिला कैद्यांना प्रशिक्षण देण्याची संधी मिळाली. शिवण, ड्रेपरी त्यांना शिकवली.

अनिताताई यांचे बालपण पुण्यातच. बारावीपर्यंत शिक्षण झाल्यावर शिवणकामाची पदविका घेतली. शिवणामध्ये करिअर करण्याचे त्यांचे स्वप्न होते. लग्न झाल्यावर सासरी गेल्यावर ठाणे येथेही त्यांनी विविध विषयांचे प्रशिक्षण देण्याचे क्‍लासेस घेतले. आता पुन्हा पुण्यात “माणदेशी’च्या माध्यमातून आपले स्वप्न पूर्ण करतानाच महिलांमध्ये परिवर्तन साधण्यासाठी त्या काम करीत आहेत. माणदेशीमध्ये आल्या त्यावेळी त्यांना संगणकाचा गंधही नव्हता. आता त्या संगणकाद्वारे सर्व कामे करीत आहेत.

लॉकडाऊनच्या काळात धुणी भांडी, पोळ्या किंवा घरकाम करणाऱ्या महिलांच्या हाताला काम राहिले नाही. “माणदेशी’मुळे अशा महिलांना काही काम देता आले. मास्क, बॅंग तयार करणे, पेपर बॅग बनवणे अशी विविध कामे सुरू झाली. समाजाची गरज ओळखून माणदेशी’ने मास्क शिवण्याच्या कामाला प्राधान्य दिले. मास्कसाठी कापड कापणे, शिवणे व अनुषंगिक बाबींचे प्रशिक्षण सुरू झाले. समक्ष प्रशिक्षण देणे शक्‍य नव्हते त्यावेळी व्हिडिओच्या माध्यमातून प्रशिक्षण देऊन या महिलांकडून मास्क शिवून घेतले. या काळात दीड लाख मास्क तयार झाले. माणदेशीच्या माध्यमातून सरकारी, निमसरकारी, खासगी कार्यालयांमध्ये तसेच विविध संस्था, कंपन्यांमध्ये या मास्कची मागणी वाढली. नोव्हेंबरमध्ये माणदेशी आणि सिप्ला कंपनी यांनी संयुक्तपणे चार लेयरचा मास्क तयार करण्याचे काम हाती घेतले.

जानेवारीपासून 60 हून अधिक महिला हे 20- 25 हजार मास्क बनविण्याचे काम करीत आहेत. एन- 5 मास्कप्रमाणेच हा चार लेयरचा मास्क संरक्षणाचे काम करतो. कमी दरामध्ये हा मास्क उपलब्ध करून देण्यात आला आहे. मास्कनंतर सध्याच्या करोना संकटात आवश्‍यक असणाऱ्या पीपीई कीटची निर्मिती करण्यासाठी साताऱ्यातील संस्थेसह माणदेशीने पुढाकार घेण्याचे ठरवले. त्यानुसार आतापर्यत अडीच हजार कीट तयार करण्यात आले आहेत. कापड कापण्यापासून पॅकिंग करण्यापर्यंतचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येते. हे कीट बनवण्यासाठी रूपाली पवणीकर यांचे मोठे सहकार्य मिळते. पुण्यातील रेड लाइट एरियातही म्हणजे बुधवार पेठेतील महिलांनाही काही काम मिळवून दिले आहे. 

त्या परिसरातील परफ्युमची मागणी लक्षात घेऊन तेथील महिलांना परफ्युम तयार करणचे प्रशिक्षण दिले. त्यांना उत्पन्नाचे साधन मिळाले. पुण्यातील वेगवेगळ्या वस्त्यांमधील महिलांनाही विविध प्रशिक्षण देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी मदत केली. माणदेशीचे काम सुरू झाल्यावर स्वतःमध्ये बदल झालाच. पण हे काम करताना अनेक महिलांच्या जगण्यामध्येही बदल करण्याचा आनंद मिळाला, असे अनिता साळवी सांगत होत्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.