यशोगाथा माणदेशी महिलांची : स्वावलंबी बनत सविता लोंढे यांनी अनेक महिलांना दिला जगण्याचा मंत्र

– श्रीकांत कात्रे

माणदेशी फाउंडेशन आणि माणदेशी महिला सहकारी बॅंकेने सर्वसामान्य महिलांच्या जगण्यात परिवर्तन केले. त्यापैकीच सविता लोंढे एक. करोनाच्या संकटकाळात त्या स्वतः च्या पायावर उभ्या राहिल्याच. पण त्यांनी इतर महिलांना रोजगार मिळवून देत त्यांच्या संसारालाही हातभार लावला.

लॉकडाऊनच्या काळात पतीची नोकरी गेलेली, मुलाच्या शिक्षणासाठी फीचा प्रश्‍न निर्माण झाला. अशा परिस्थितीशी झुंज देत माणदेशीच्या सहकार्याने सविता लोंढे यांनी मेहनतीने मार्ग काढला. त्यातून त्यांच्या कुटुंबाच्या जगण्याला दिशा दिलीच. 

परंतु, त्या संकटात सविताताई इतर महिलांच्याही आधार बनल्या. सिन्नर (जि. नाशिक) येथील माणदेशीच्या शाखेतून मिळालेल्या प्रोत्साहनामुळे शिवणकामापासून सुरू झालेला सविताताईंचा प्रवास आता आटा चक्की ते कुरडया, पापड, शेवया आणि राखी उत्पादन यांसारख्या हंगामी व्यवसायांपर्यंत पोहचला आहे.

 सिन्नरमध्ये विडीकाम करणाऱ्या महिला आणि हातावरचे पोट असणारे अनेक जण लॉकडाऊनमुळे अडचणीत आले. अशा वेळी सविता लोंढे यांची माणदेशीच्या सारिका धारणकर यांच्याशी भेट झाली. माणदेशीच्यावतीने त्यांना मास्क तयार करण्याचे प्रशिक्षण मिळाले. दोन दिवसांत त्यांना चारपाच प्रकारचे मास्क तयार करता आले. 

ते काम पाहून माणदेशीनेच त्यांना पहिली शंभर मास्क बनविण्याची ऑर्डर दिली. तेही काम आवडल्यावर कापडांच्या, औषधाच्या दुकानांत मास्कची विक्री करण्याबाबत माणदेशीने त्यांना सुचविले. मार्केटमध्ये जाऊन कसे बोलायला पाहिजे, याचीही कल्पना नसलेल्या सविता लोंढे यांना ते अवघड वाटत होते. मग माणदेशीच्या मनीषा भालेराव त्यांच्यासमवेत आल्या. त्यावेळी 1200 मास्क बनविण्याची ऑर्डर मिळाली. 

तिथून प्रवास सुरू झाल्यावर त्यांनी मागे वळून बघितलेच नाही. तीन महिला त्यांच्या मदतीला घेतल्या. मग मागणी वाढेल तशी काम करणाऱ्या महिलांची संख्या वाढत ती 21 पर्यंत पोहचली. सविता लोंढे यांचे पतीही मास्कचे कटिंग करून देत मदतीला आले. लॉकडाऊनच्या पावणेदोन वर्षांच्या काळात त्यांनी 80- 85 हजार मास्क बनविले. त्यातून 8 ते 9 लाखांचे उत्पन्न मिळाले.

महिलांची मजुरी, कच्चा माल असा खर्च वगळता चार लाखांच्या आसपास फायदा झाला. त्यामुळे घर सुधारले, मुलाच्या शिक्षणासाठी फी भरता आली, असे त्या सांगत होत्या. काही महिलांच्या सहकार्याने महालक्ष्मी आटा चक्की हा नवीन व्यवसाय त्यांनी सुरू केला. बाजरी आणि गहू दळण्यासाठी दोन स्वतंत्र मशीन घेतल्या. मसाला ग्राइंडर घेतला. 

मास्क तयार करण्यामुळे त्यांचा आत्मविश्‍वास वाढला होता. त्या काळात 21 घरे चालवली. आता आणखी घरे चालविता येतील, या विश्‍वासाने त्या व्यवसायाचा विस्तार करू लागल्या आहेत. त्यासाठी तीन महिलांना बरोबर घेऊन त्या गुंतवणूक करीत आहेत. आता दहा लाखांचे कर्ज घेऊन पापडासाठी ड्रायर, कांडप मशीन, शेवई मशीन अशी मशिनरी घ्यायची आहे.

माणदेशीमुळे ऑनलाइन मार्केटिंगचे तंत्र लक्षात आले. माणदेशीने गेल्या ऑगस्टमध्ये राखी बनविण्याचे प्रशिक्षण दिले. त्यातूही चांगला व्यवसाय मिळाला. आता आणखी काही महिलांना प्रशिक्षण देऊन पुढील वर्षी अधिक राख्या करून होलसेल मार्केटला विक्री करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. माणदेशीने दिलेल्या प्रशिक्षणामुळे हे साध्य झाले. 

अजूनही माणदेशीची कार्यशाळा आहे, ही आम्हा महिलांच्यादृष्टीने सुवर्णसंधी आहे, असे त्या सांगत होत्या. पैशाला पैसा जोडून व्यवसाय कसा उभा करावा याचे गणित सविताताईंना बरोबर जुळले आहे, असे माणदेशीच्या प्रशासन अधिकारी वनिता शिंदे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, “कमी गुंतवणुकीत कोणता व्यवसाय सुरु करता येईल व त्या व्यवसायाला कोणत्या मशिनरीची आवश्‍यकता आहे, यासाठी त्या यू ट्यूबचा वापर करतात. 

लाखाला लाख रुपये कसे उभे करायचे हे सविताताईंकडून शिकायला मिळते. माणदेशीमधून मास्कचे प्रशिक्षण घेऊन पुढे मास्क बनवून विकले. त्यातून चार लाख रुपये नफा कमावला. नफ्यामधून आटा चक्की, डाळ मिल आणि गव्हाचा चिक काढायची मशीन अशा मशिनरीज त्यांनी विकत घेतल्या. शिवाय काही पैशांची गुंतवणूक म्युचअल फंडामध्ये करून राहिलेले पैसे मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले. 

व्यवसायाला टेक्‍नॉलॉजीची जोड देऊन व्यवसायवाढ केली. सोबत भविष्यासाठी तरतूद केली. यापेक्षा “स्मार्ट इन्व्हेस्टमेंट’ ती काय असू शकते.’ दहा महिलांच्या हाताला काम देणाऱ्या आणि गटातून व्यवसाय चालविणाऱ्या सविताताईंना माणदेशीचे “हिसाब, हिंमत आणि हुन्नर’ हे त्रिगुणी सूत्र बरोबर उमजले आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.