वाघोली – राज्य सरकारने (दि. ७ ) रोजी पासून जिल्ह्यातील मंदिरे व धार्मिक स्थळे खुली केली आहेत. पुणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व मंदिरे खुली करण्याबाबत महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे, पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण दगडे पाटील, संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी मागणी केली होती. या मागणीला यश मिळाले असल्याचे महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा राज्य कार्यकारिणी सदस्य गणेश कुटे यांनी सांगितले आहे.
पुणे जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हॉटेल, बियर बार, तसेच इतर मॉल, दुकाने, क्रीडांगणे यांना निश्चित वेळा करून सोशल डिस्टंसिंग चा आधार देत सवलती देण्यात आल्या होत्या. याच प्रमाणे जिल्ह्यातील धार्मिक स्थळे व मंदिरे तातडीने खुली करून नागरिकांना दर्शनाचा लाभ मिळवून देण्याकरिता जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलावी अशी मागणी भाजप युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती.
धार्मिक स्थळे तथा मंदिराच्या भोवती अनेक लहान मोठ्या हातावर पोट असणाऱ्या व्यावसायिकांना मंदिरे खुली केल्याने कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावता येऊ शकतो. ही कुटुंबे उपासमारीच्या कक्षेत होती. शासनाने मंदिरे खुली करून मंदिराच्या भोवती असणाऱ्या रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या करण्यासाठी तातडीने मदत करावी अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली होती. त्याला यश मिळाले असून नागरिकांची श्रद्धास्थाने खुली केल्याने आगामी काळात सर्वत्र भक्तीमय वातावरण पाहायला मिळेल असे गणेश कुटे यांनी सांगितले.