स्वतःमधील क्षमता विकसित करण्यातच यश!

विवेक डोबा : “आयआयएमएस’च्या वतीने प्राध्यापकांची कार्यशाळा उत्साहात

चिंचवड – आपल्या दररोजच्या जीवनात प्रत्येकाने स्वतःमधील क्षमता विकसित करणे हाच यशस्वी जीवनाचा पाया आहे, असे मत प्रेरणादायी व्याख्याते विवेक डोबा यांनी व्यक्त केले. चिंचवड येथील यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सायन्स (आयआयएम) च्या वतीने आयोजित एकदिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सध्याच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकजण व्यस्त असल्याने आपल्याला स्वतःमधील वेगळेपणा, आपले स्वतःचे वैशिष्ट्‌य समजून घ्यायलाही सवड नाही. त्यामुळे आपल्याला अपेक्षित यश प्राप्त होण्यात अडचणी येतात, म्हणूनच प्रत्येकाने आपल्यातील खासियत, इतरांपेक्षा आपल्यात काय वेगळे आहे हे जाणून घेतले पाहिजे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार भविष्यात प्रत्येक कुटुंबामागे एका समुपदेशकाची, मानसोपचारतज्ज्ञाची गरज लागणार असल्याचे सांगितले जाते, ही नक्कीच चिंताजनक बाब आहे. आपल्या आयुष्यातील समस्यांना तोंड देताना आपण फक्त सहानुभूती देणाऱ्यांची मदत घेतो का समस्येवरचा उपाय सांगणाऱ्याकडे धाव घेतो हे तपासा. आज नोकरी करणारा माणूस नोकरीत समाधानी नाही, तो व्यवसाय करण्याचा विचार करू लागला आहे, तर दुसरीकडे व्यवसाय करणाऱ्याला पुन्हा नोकरीच बरी असे वाटू लागले आहे.

असंख्य प्रश्‍नांची न दिसणारी ओझी आज प्रत्येकाच्या खांद्यावर आहेत. तेव्हा गरज आहे ती क्षणभर थांबून ही ओझी हलकी वाटावीत म्हणून स्वतःला सिद्ध करण्याची, स्वतःवरचा खरा आत्मविश्‍वास वाढविण्याची, असा मोलाचा संदेश डोबा यांनी दिला. संस्थेचे संचालक डॉ. मिलिंद मराठे, डॉ. सुनिता पाटील, संजय छत्रे, अजय रांजणे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. पुष्पराज वाघ यांनी केले. अधिष्ठाता डॉ. राजेंद्र सबनीस यांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.