आशियाई स्पर्धेत यश, टोकियोत काय होणार

जागतिक स्तरावर सर्वात जास्त लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा देशम्हणजे आपला भारत. जवळपास 130 कोटी लोकसंख्या असूनही क्रीडा क्षेत्रात पदके नाममात्र अशी परिस्थिती आहे. लोकसंख्येच्या बाबत बोलायचे तर चीन आपल्या पुढेच आहे, पण केवळ आकडेवाढ नसून गुणवत्ताही तितकीच अफलातून आहे. यंदा भारतीय खेळाडूंनी जागतिक स्तरावर अत्यंत यशस्वी कामगिरी केली त्यातही नुकत्याच पार पडलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांवर तर आपला दबदबा निर्माण केला. पदकांची रास ओतली, पण याची पुनरावृत्ती जपानच्या टोकियोमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिकमध्ये होणार का हा खरा प्रश्न आहे.

भारतीय क्रीडा क्षेत्रासाठी दरवर्षी केंद्र सरकार अंदाजपत्रकात जी तरतुद करते ती पुरेशी नाही. त्यात चीन, जपान आणि कोरियाप्रमाणे भरघोस वाढ केली तरच खेळाडूंना जागतिक स्तरावरच्या अत्याधुनिक सुविधा मिळतील व त्याचा लाभ घेत खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने यश मिळवतील.

यंदाची आशियाई स्पर्धा नेपाळमध्ये झाली. त्यात पदकांच्या शर्यतीत आपण सगळ्यांनाच मागे टाकले. पण जितकी पदके नेपाळमध्ये मिळाली त्याच्या निम्मी पदके जरी आपण टोकियोत मिळविली तरी क्रीडा क्षेत्रातच नव्हे तर संपुर्ण स्तरावर कायापालट होईल. मुळात क्रिकेटकडे जाणारे प्रायोजक अन्य खेळांबाबतही रस घेतील, अर्थकारण बदलेल. रोजगाराच्या संधी निर्माण होतील. खेळाडूंना नवे क्षितिज खुले होईल आणि इतकेच नव्हे तर देशात खरी क्रीडा संस्कृती तयार होईल. नुसती तयारच नाही तर तळागाळापर्यंत ही क्रीडा संस्कृती रुजण्यास सुरुवात होईल.

केंद्र सरकारने टार्गेट ऑलिम्पिक पोडियम (टीओपी) योजना तयार केली आहे, त्यात या स्पर्धेतील वैयक्तिक पातळीवर अत्यंत अभिमानास्पद कामगिरी केलेल्या खेळाडूंना स्थान द्यायला हवे. या योजनेचा लाभ तर त्यांना मिळेलच पण प्रायोजकांचा आधारही मिळेल अणि त्याचबरोबर देशाला सातत्याने पदके जिंकून देणारे खेळाडू देखील मिळतील. अथेन्स ऑलिम्पिकमध्ये 2004 साली राजवर्धन राठोडने नेमबाजीत पदक मिळविले तेव्हापासून आपण सुद्धा अशीच कामगिरी करु शकतो हा विश्‍वास देशातील युवा गुणवत्तेला मिळाला.

दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताला जे यश मिळाले त्याची पुनरावृत्ती टोकियोत व्हावी तर आणि तरच देशाच्या क्रीडाक्षेत्रात अमुलाग्र बदल होतील. या स्पर्धेसाठी जे खेळाडू भारतीय संघात होते, त्यात एकही स्टार खेळाडू नव्हता पण देशाला पसाभर पदके याच रॉ मटेरियलने मिळवुन दिली व आगामी काळात अशाच कामगिरीसाठी आश्वासक परिस्थिती देखील तयार केली. आशियाई स्तरावर सगळ्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जात असलेल्या या स्पर्धेत पहिल्याच दिवशी 17 पदके मिळवुन आपण आश्‍चर्याचा धक्का दिला. मग त्यात प्रत्येक दिवशीवाढ होत राहीली व पदकांचे अर्धशतक बघता बघता पुर्ण झाले व शतकी मजलही मारली. खो-खो, मैदानी, नेमबाजी, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या क्रीडा प्रकारात आपण सगळ्याच सहभागी संघांना पराभूत करत नवा इतिहास रचला.

व्हॉलिबॉलमध्ये तर भारतीय खेळाडूंनी केलेली कामगिरी सो कॉल्ड क्रीडा समिक्षकांनाही बुचकळ्यात टाकले. या संघाची जेव्हा निवड झाली तेव्हा अनेकांनी नाके मुरडली होती व हे काय दिवे लावणार असा सुर उमटला होता, पण खेळाडूंनी केवळ दिवेच नाही तर संपुर्ण देशच उजळुन टाकला. मैदानी स्पर्धेतही हेच चित्र आहे. धावणे, उंचउडी, 100, 1500 मीटर शर्यतीत आपण अभुतपुर्व यश मिळविले. संघातील खेळाडू काही जास्त अनुभवी नव्हते, प्रशिक्षक देखील स्थानिक होते तरीही आपण यश मिळविले, त्याचे प्रमुख कारण हेच की खेळाडूंमध्ये यश मिळविण्याची व त्यासाठी अथक मेहनत घेण्याची इच्छाशक्ती होती. काहीवेळा गुणवत्तेला न्याय मिळत नाही पण इच्छाशक्तीला निश्‍चितच मिळतो. या स्पर्धेत मोठ्या प्रमाणावर प्रायोजकता नव्हती तरीही कोणतेही कारण न देता आपल्या खेळाडूंनी दर्जा सिद्ध केला व भारतीय क्रीडा क्षेत्राला सेकंड बेंच देखील परिपुर्ण आहे याची साक्ष दिली.

मैदानी स्पर्धेत अर्चना सुसिंद्रन, एम. जश्ना (उंच उडी), सर्वेश अनिल कुशारे (उंच उडी) आणि अजयकुमार सरोज (1500 मी.) यांनी सुवर्णभरारी घेतली. कविता, चंदाने आणि चित्रा पलाकीझ यांनी केवळ यश मिळविले असे नाही तर आगामी काळात भारताचे मैदानी स्पर्धेतील वर्चस्व वाढेल याची साक्ष दिली. मैदानी स्पर्धेतच नाही तर नेमबाजीतही भारतीय खेळाडूंनी देदिप्यमान कामगिरी केली. महिलांच्या 10 मीटर एअर रायफल प्रकारात मेहुली घोषने सुवर्णपदक मिळवले.

तिने अंतिम फेरीत 253.3 गुण मिळवले. ही जागतिक विक्रमापेक्षा ही कामगिरी 0.4 गुणाने सरस ठरली. मात्र असे असले तरी 19 वर्षीय मेहुलीची ही कामगिरी जागतिक विक्रम ठरणार नाही. कारण, विक्रमासाठी दक्षिण आशियाई स्पर्धेतील कामगिरी आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ गृहीत धरत नाही. विक्रमासाठी केवळ विश्वकरंडक, जागतिक पात्रता तसेच ऑलिम्पिक कोटा स्पर्धेतील कामगिरीच गृहीत धरली जाते. या प्रकारातील जागतिक विक्रम सध्या अपूर्वी चंडेलाच्या नावावर आहे. श्रीयांका सादान्गी व श्रेया अगरवालने 10 मीटर एअर रायफलमधील सांघिक सुवर्णही भारताला मिळवुन दिले. च्या खात्यात जमा झाले. पुरुषांच्या 50 मीटर 3पी प्रकारात चेनसिंगने सुवर्णपदक मिळवताना यापुर्वी कधीही घडले नाही अशी कामगिरी करत स्पर्धा गाजविली. अखिल शेओरॉन, योगेश सिंग व गुरप्रीतसिंग यांच्या रुपाने देशाला राजवर्धन राठोडचे वारसदार मिळाले ही खात्री दिली

तायक्वांदो या खेळात या आधी भारताच्या खेळाडूंना केवळ बॅग घेऊन येणारे पर्यटक असेच संबोधले जायचे यावेळी अन्य देशांच्या खेळाडूंना प्रेक्षक बनुन भारतीय खेळाडूंनी आगामी आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी पदकाची संधी निर्माण केली.

भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी खो-खो स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले ही चांगली बाब असली तरी काही क्रीडा प्रकारात भारताला अद्याप खुप मोठी मजल मारावी लागणार आहे. मुख्यत्वे बॅडमिंटन आणि टेबल टेनिसमध्ये चीन, जपान, कोरिया, इंडोनेशिया या देशांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी कॉर्नरगेममध्ये प्रचंड सुधारणा घडवावी लागणार आहे. अचंता शरथ कमाल या एकाच खेळाडूवर आपण अवलंबुन असतो आणि तो प्रत्येकवेळी अपयशी ठरतो. त्याचा पर्याय आजुनही आपल्याला सापडलेला नाही. बॅडमिंटनमध्ये फुलराणी सायना नेहवाल आणि पीव्ही सिंधू यांच्यानंतर एकही मुलगी आंतरराष्ट्रीय स्तरावर सरस कामगिरी करणारी मिळालेली नाही. मुळात देशात ज्या स्पर्धा होतात त्यांचा दर्जा काय आहे याचाही विचार केला जावा. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना जो वेग परदेशी खेळाडू दाखवितात तो आचंबीत करणारा आहे.

मेहुलीची मक्तेदारी
भारताची नवोदीत खेळाडू मेहुली घोषने या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात सरस कामगिरी केली आहे. तीने या स्पर्धेत सुवर्णपदकांची कमाई तर केलीच पण त्याचबरोबर सांघिक गटात देखील भारतीय संघाने मक्तेदारी निर्माण केली. मेहुलीने या आधी 2018 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धेत रजत आणि त्यापाठोपाठ राष्ट्रकुल आणि युथ ऑलिंपिकमध्ये रजतपदक मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे.

टेबलटेनिस संघाचेही वर्चस्व
भारताच्या टेबल टेनिस संघानेही पुरुष व महिला गटात तसेच मिश्र दुहेरीत अव्वल कामगिरी करत तिहेरी सुवर्णपदकाला गवसणी घातली. युवा खेळाडू हरमीत देसाई व अँथनी अमलराज यांनी दुहेरीत मक्तेदारी निर्माण करताना सुवर्णपदक जिंकले. महिला गटात महारशाष्ट्राच्या मधुरीका पाटकरने श्रीजा अकुलाच्या साथित सुवर्णपदकाला गवसणी घातली. मिश्र दुहेरीत हरमीतदेसाईने सुतिर्था मुखर्जीसह सुवर्णपदक मिळविले. अचंथा शरथ कमालचा फॉर्म खालावला असला तरी या स्पर्धेतून नवी उमेद असलेले खेळाडू भारताला गवसले आहेत याचेच समाधान जास्त आहे.

 अमित डोंगरे

Leave A Reply

Your email address will not be published.