सातारा -आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सातारा शहराची हद्दवाढ मंजूर केल्यानंतर हद्दवाढीत समाविष्ट भागात मुलभूत सोयी सुविधा आणि विविध विकासकामे करण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यातून अजित पवार यांच्या सहकार्यामुळेच 48 कोटी 50 लाख 46 हजार 122 रुपये मंजूर झाले असून त्यातील पहिला 25 कोटी रुपयांचा हप्ता राज्य शासनाकडून नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे.
यामुळे हद्दवादीत समाविष्ट झालेल्या नवीन भागातील विकासकामे मार्गी लागणार असून याबद्दल शिवेंद्रसिंहराजे यांनी पवार आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत. सातारा शहरालगतच्या त्रिशंकू भागाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी हा भाग सातारा पालिकेच्या कार्यक्षेत्रात येणे आवश्यक होते. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सातत्याने पाठपुरावा करून सातारा शहराच्या हद्दवाढीला मंजुरी मिळवली. ज्या अजितदादांनी हद्दवाढीला मंजुरी दिली त्याच अजितदादांच्या माध्यमातून आता या नवीन भागाच्या विकासासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीही उपलब्ध झाला आहे. नगर विकास विभागाने हद्दवाढीत समावेश झालेल्या या नवीन भागातील रस्ते, गटारे, पथदिवे आदी मुलभूत सुविधा मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पात निधीला मंजुरी दिली होती. त्यातील 25 कोटी रुपये पहिला हप्ता नुकताच नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आला आहे. नवीन समाविष्ट भाग शाहूपुरी, शाहूनगर, पिरवाडी, विलासपूर आदी भागांतील विकासकामे मार्गी लावण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार भरीव निधी उपलब्ध झाला असून आता या भागातील अनेक प्रश्न मार्गी लागणार
आहेत.