मुंबई – केंद्रीय अर्थसंकल्पात यंदा महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 13,539 कोटी अशी विक्रमी तरतूद करण्यात आली आहे. त्याचा राज्याच्या विकासावर खूप चांगला परिणाम होईल, असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे. दिल्लीतून व्हिडीओ लिंकद्वारे पत्रकार परिषदेला संबोधित करताना वैष्णव म्हणाले की, महाराष्ट्रासाठी 2023-24 च्या अर्थसंकल्पात 2009 ते 2014 या कालावधीतील सरासरी वाटपाच्या 11 पट तरतूद करण्यात आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून केंद्र सरकारला चांगले सहकार्य मिळत असल्याचे सांगत, वैष्णव यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बुलेट ट्रेन प्रकल्पाला राज्य सरकारकडून कोणतीही मंजुरी मिळाली नसल्याच्या आरोपाचा पुनरुच्चार केला. “मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाची अंतिम मुदत ऑगस्ट 2026 आहे.
वंदे भारत एक्स्प्रेस गाड्यांचे उत्पादन वाढवण्यात आले असून, दिवसात एक ट्रेन तयार केली जाईल, असे ते म्हणाले. “आम्ही महाराष्ट्रातील 123 स्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकास करू. सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या विकासासाठी मार्चअखेर निविदा उघडल्या जातील. त्याचे प्राथमिक पूर्व-कार्य आधीच सुरू झाले आहे, असे ते म्हणाले.