कृषी मालाच्या रेल्वे वाहतुकीवर शेतकऱ्यांना अनुदान

नागपूर –आत्मनिर्भर अभियानाचा भाग म्हणून केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाअंतर्गत ‘ऑपरेशन ग्रीन’ राबविले जात आहे. या योजने अंतर्गत संत्रे, पालेभाज्या यासारख्या कृषी मालाच्या अतिरिक्त उत्पादनाची वाहतूक बाजारपेठांमध्ये रेल्वेद्वारे वाहतूक करण्यासाठी शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान हे रेल्वे वाहतूकीसाठी दिले जाते.

कृषी मालाचे संग्रहण आणि शीत साखळी साठी सुद्धा 50 टक्के अनुदान दिले जाते. मात्र हे अनुदान मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना अन्न प्रक्रिया मंत्रालयाच्या ‘संपदा’ या पोर्टलवर ऑनलाईन स्वप्रमाणित कागदपत्रे जोडावे लागतात.

ही अडचण लक्षात घेऊन केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी फळे आणि पाले-भाज्यांची रेल्वे मार्फत वाहतूक करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर वाहतुकीसाठीचे अनुदान हे वाहतूकीसाठी नोंदणी करण्याच्या वेळेसच देण्याचे रेल्वेला सुचविले होते.

त्यानुसार रेल्वे मंत्रालय आणि केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने कृषी मालाच्या रेल्वे वाहतुकीमध्ये 50 टक्के सवलत देण्याचे मान्य केले आहे. रेल्वे वाहतूकीच्या या सहकार्याच्या भूमिकेबद्दल गडकरी यांनी एका ट्विटद्वारे दोन्ही मंत्रालयाचे आभार मानले आहेत.

दरम्यान, नागपूरातून बांग्लादेशला रेल्वेद्वारे संत्रा वाहतूक करण्याचा निर्णयही यापूर्वीच मध्य रेल्वेने घेतला असून लवकरच संत्र्याची वाहतूक नागपूर रेल्वेद्वारे होणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.