या पुढे नाटकात काम न करणेच योग्य ठरेल, सुबोध भावे संतापला

मुंबई – नाटकाचा प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांचे मोबाईल वाजल्याने विचलित झाल्यानंतर अभिनेता सुबोध भावे याने सोशल माध्यमा वरुन संतापजनक पोस्ट टाकत यापुढे नाटकात काम न करणेच योग्य ठरेल, असे म्हटले आहे.

सुबोध भावे याने फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून याबाबत पोस्ट केली आहे. सुबोधने प्रेक्षकाबदल नाराजी व्यक्त करताना म्हटले आहे की, “अनेक वेळा सांगून, विनंती करूनही जर नाटक चालू असताना मोबाईल वाजत असतील तर याचा अर्थ आपल्या नाटकात काहीतरी कमी आहे किंवा नाटक संपूर्ण एकरूप होऊन बघण्याची गरज वाटत नाही. यावर उपाय एकच या पुढे नाटकात काम न करणं. म्हणजे त्यांच्या फोन च्या मध्ये आमची लुडबुड नको. कारण फोन जास्त महत्त्वाचा. नाटक काय टीव्ही वर पण बघता येईल.”

दरम्यान, नाटकादरम्यान काही प्रेक्षकांचे मोबाईल सतत वाजत असतात, त्यामुळे इतर नाट्यप्रेमी प्रेक्षक आणि मंचावरील कलाकारांची एकाग्रता भंग होते. प्रेक्षकांच्या अशा वागण्यामुळे याआधीही अनेक नाट्य कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे, आणि आता त्यात अभिनेता सुबोध भावे याची भर पडली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.