पंचनामे करून त्वरित प्रस्ताव सादर करा

वाईतील शासकीय आढावा बैठकीत आ. मकरंद पाटील यांचे महसूल विभागाला आदेश

वाई  – महाबळेश्‍वर, वाई व खंडाळा तालुक्‍यात झालेल्या अतिवृष्टीने आलेल्या पुरात सर्वसामान्यांची घरे, शेती, विहिरी, जनावरे, पिकांचे तसेच सार्वजनिक मालमत्तेचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून शासनदरबारी प्रस्ताव पाठविण्यात यावेत. नुकसानग्रस्तांपर्यंत जास्तीतजास्त शासकीय मदत पोहचवून त्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याचे काम सर्वांनी करावे, असे उद्गार आमदार मकरंद पाटील यांनी काढले.

येथील पंचायत समितीच्या सभागृहात वाई, खंडाळा व महाबळेश्‍वार तालुक्‍यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी बोलविण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापुरकर, बाळासाहेब भिलारे, पंचायत समितीच्या सभापती सौ. रजनी भोसले, उपसभापती अनिल जगताप, वाईचे तहसीलदार रणजित भोसले, खंडाळाचे तहसीलदार दशरथ काळे, महाबळेश्‍विरच्या तहसीलदार मिनल कळसकर, वाईच्या मुख्याधिकारी विद्याताई पोळ, खंडाळा मुख्याधिकारी शंकरराव गोरे, लोणंदचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर, राजेंद्र राजपुरे, पंचायत समिती सदस्य विक्रांत डोंगरे, मधुकर भोसले, उपनगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक चरण गायकवाड, प्रदिप चोरगे, राजेश गुरव, महादेव मसकर, शशिकांत पवार, मदन भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी तीन्ही तालुक्‍यातील विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या खात्याचा आढावा सादर केला. पुरामुळे झालेले नुकसान व पंचनाम्यांचे सुरू असलेल्या कामाबाबत माहिती दिली. महाबळेश्‍वनर तालुक्‍यात 45 कुटुंबे विस्थापित करण्यात आली असून 61.37 हेक्‍टर शेतजमीनीचे नुकसान झाले आहे. तर 153 घरांचे अशंतः तर 7 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे. 15 गावांमध्ये पाणी पुरवठा स्किमचे, 6 विहिरींचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषदेच्या 16 शाळांचे अशंतहा नुकसान झाले आहे. तसेच 3 शेळ्या व सहा म्हैशींचा मृत्यू झाला असल्याची माहिती तहसीलदार मिनल कळसकर यांनी दिली. त्यावर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आ. पाटील यांनी शेतकऱ्यांचे घरांचे, विहिरीचे, शेतजमीनीचे, जनावरांचे पंचनाम करून प्रस्ताव सादर करावेत.

जे पूल वाहून गेले असतील किंवा रस्ते खराब झाले असतील त्यांची तात्पुरती डागडुजी करून वाहतूक सुरू करावी. तसेच त्यांचे नवीन प्रस्ताव शासनाकडे त्वरित पाठवावेत असे सांगितले. तसेच भूगर्भ शास्त्रज्ञ यांना तीन्ही तालुक्‍यात जेथे जेथे भूस्खलन झाले आहे ते दाखवून त्यांच्याकडून अहवाल घ्यावा अशा सूचना दिल्या. वाई तालुक्‍याचा आढावा सादर करताना तहसीलदार रणजित भोसले यांनी मेणवली, खडकी, चिंधवली, सिध्दनाथवाडी येथील सुमारे 98 कुटुंबे स्थलांतरीत केली. 287 घरांचे अंशत नुकसान झाले आहे. 11 विहिरींचे नुकसान झाले असून 9 ठिकाणी जमिनी खचल्या आहेत. 17 शाळांचे 28 खोल्यांचे नुकसान झाले आहे. तर अंदाजे 5809 हेक्‍टर शेतजमीनीचे नुकसान झाले आहे.

एमएसईबीचे 62 पोल पडले असून सर्व तालुक्‍यात विद्युत पुरवठा सुरळीत सुरू आहे. तसेच काही गावांमध्ये बंधारे वाहून गेले असून पाझर तलावांना गळती लागली असल्याचे सांगितले. यावर आ. पाटील यांनी त्वरित नुकसानीचे पंचनामे करून शासन दरबारी सादर करावेत. असे सांगून वाई एसटी आगाराने सर्व गावांना बंद केलेल्या एसटी फेऱ्या पूर्ववत सुरू कराव्यात, अशा सूचना दिल्या.
खंडाळा तालुक्‍यात 3 कुटुंबे विस्थापित केली असून 5 पुलांचे नुकसान झाले आहे. तर 282 घरांचे अंशतः नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद, पीडब्लूडीच्या 14 रस्त्यांचे नुकसान झाले आहे.

तसेच एक तरुणही पुरात वाहून गेल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे तहसीलदार दशरथ काळे यांनी सांगितले. आ. पाटील यांनी पुलांचे व घरांचे तसेच पिकांचे पंचनामे लवकरात लवकर पूर्ण करून शासन दरबारी पाठवावेत. तसेच मयत झालेल्या युवकाबाबतही प्रस्ताव सादर करावा अशा सूचना केल्या. तीनही तालुक्‍यात पुरामुळे प्रचंड नुकसान झाले असून सर्वच विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी या नैसर्गिक आपत्तीत चांगले काम केले असल्याचे त्यांनी नमूद केले. बैठकीस तिन्ही तालुक्‍यातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.