जि.प.तील औषध घोटाळा अहवाल सादर करा

जि. प. अध्यक्षांनी दिला अधिकाऱ्यांना आदेश
जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे तर 539 उपकेंद्रे
पुणे – जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या मुदतबाह्य औषध घोटाळाप्रकरणी आतापर्यंत जेवढ्या चौकशी केल्या आहेत. त्यांचे सर्व अहवाल एकत्रित करून येत्या पंधरा दिवसांत सादर करावे. तसेच या चौकशीमध्ये कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या कोरेगाव पार्क येथील जागेत मुदतबाह्य औषधांचा साठा भंगाराच्या टेम्पोमध्ये पडून असल्याचा धक्‍कादायक प्रकार सदस्य व भाजपा गटनेते शरद बुट्टे पाटील यांनी उघडकीस आणला. जिल्ह्यात 96 प्राथमिक आरोग्य केंद्रे तर 539 उपकेंद्रे आहेत. त्या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना वेळेवर औषधे मिळत नाहीत. तर, दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या गोदामात औषधांचा साठा टेम्पोत सापडल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणी माजी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले. तसेच अनेक वर्षांपासून दडविण्यात आलेला गोखले इन्स्टिट्यूटचा अहवालही मागविण्यात आला. त्यामुळे अनेक गंभीर खुलासे समोर आले.

दरम्यान, या प्रकरणाला तीन महिने झाले. मध्येच विधानसभा निवडणुका आल्या. त्यामुळे औषध घोटाळा प्रकरण बाजूला राहिले. आता निवडणुका संपल्या आणि प्रशासकीय कामांना गती मिळताच सदस्यांनी पुन्हा औषध घोटाळ्याचे काय? असा प्रश्‍न उपस्थित केला. तीन महिन्यात समितीने काय चौकशी केली, गोखले इन्स्टिट्यूटचा अहवालाचे पुढे काय? आतापर्यंत कोणावर कारवाई करण्यात आली.

दोषींची नावे जाहीर करा, अशी मागणी सदस्य शरद बुट्टेपाटील आणि रणजित शिवतरे यांनी स्थायी समितीच्या बैठकीत केली. त्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर, “मुदतबाह्य औषध घोटाळ्याच्या विविध चौकशीचे अहवाल एकत्रित करून तो अहवाल मांडा आणि संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांसह सहभागी सर्व व्यक्तींवर कारवाई करा,’ असे आदेश जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते यांनी प्रशासनाला दिले.

Leave A Reply

Your email address will not be published.