“सुभाषचंद्र बोस यांची हत्या काँग्रेसने केली” ; साक्षी महाराज यांचा गंभीर आरोप

उन्नव: भारतीय जनता पक्षाचे खासदार साक्षी महाराज हे सतत आपल्या वादग्रस्त विधानाने वादात अडकतात. यावेळी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या हत्येमागे काँग्रेसचा हात होता, असे गंभीर आरोप साक्षी महाराज यांनी केला आहे. काँग्रेसच्या लोकांनीच सुभाषचंद्र बोस यांची हत्या घडवल्याचे ते म्हणाले. बोस यांच्या १२५ व्या जयंती निमित्त साक्षी महाराज उत्तर प्रदेशातल्या उन्नावमध्ये बोलत होते.

सुभाषचंद्र बोस यांचा अकाली मृत्यू झाला. काँग्रेसच्या लोकांनीच त्यांची हत्या घडवून आणली, असा माझा आरोप आहे. बोस यांची लोकप्रियता अतिशय जास्त होती. त्यांची लोकप्रियता पंडित जवाहरलाल नेहरूंपेक्षा अधिक होती. बोस यांच्या लोकप्रियतेसमोर महात्मा गांधीही कुठेच नव्हते, असे साक्षी महाराज म्हणाले.

‘आपल्याला स्वातंत्र्य मागून मिळालेले नाही. कारण इंग्रज इतके साधे नव्हते. तुम मुझे खून दो, में तुम्हे आझादी दूंगा, असं सुभाषचंद्र बोस म्हणायचे. त्यामुळे आपल्याला रक्त सांडून स्वातंत्र्य मिळालं आहे, असं मला वाटतं,’ अशा शब्दांत साक्षी महाराज यांनी बोस यांच्याबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

काल सुभाषचंद्र बोस यांची १२५ वी जयंती होती. त्या निमित्तानं केंद्र सरकारनं पराक्रम दिवसाचं आयोजन केलं होतं. विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्र्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली वाहिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.