मुंबई – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना (एमएसएलटीए) आयोजित 15 व्या एमएसएलटीए रमेश देसाई मेमोरियल 12 वर्षांखालील सब-ज्युनियर राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात दिल्लीच्या ओजस मेहलावट, हरियाणाच्या आरव चावला, तर मुलींच्या गटात कर्नाटकाच्या हरिथाश्री वेंकटेश, तामिळनाडूच्या माया राजेश्वरन यांनी दुहेरी गटातील विजेतेपदाबरोबरच एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करत दुहेरी मुकुटाकडे वाटचाल केली आहे.
जी.ए.रानडे टेनिस कॉम्प्लेक्स येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत एकेरीत मुख्य ड्रॉच्या उपांत्य फेरीत मुलांच्या गटात तिसऱ्या मानांकित दिल्लीच्या ओजस मेहलावट याने महाराष्ट्राच्या आयुश पुजारीचा 6-4, 6-2 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दुसऱ्या मानांकित हरियाणाच्या आरव चावलाने महाराष्ट्राच्या अमोघ दामलेचा 6-4, 6-1 असा पराभव केला. दुहेरीत अंतिम फेरीत ओजस मेहलावत व आरव चावला यांनी प्रतिक शेरॉन व रुद्र बाथम यांचा 6-1, 6-0 असा पराभव करून या गटाचे विजेतेपद पटकावले.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत तिसऱ्या मानांकित कर्नाटकाच्या हरिथाश्री वेंकटेश हिने महाराष्ट्राच्या मेहक कपूरचा 6-1, 6-1 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या सामन्यात तामिळनाडूच्या दुसऱ्या मानांकित माया राजेश्वरन हिने महाराष्ट्राच्या पाचव्या मानांकित प्रिशा शिंदेचा 6-0, 6-3 असा पराभव केला.
दुहेरीत अंतिम फेरीच्या लढतीत हरिथाश्री वेकंटेशने माया राजेश्वरनच्या साथीत स्निग्धा कांता व जीडी मेघना यांचा 6-0, 6-1 असा पराभव करून विजेतेपद पटकावले. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण खुशरो श्रॉफ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मनोज वैद्य, सोनल वैद्य आणि वैशाली शेकटकर आदी उपस्थित होते.