पुणे – उत्तर प्रदेश संघाने झारखंड संघाला पराभूत करताना सब-ज्युनियर राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. मुलींच्या गटातून आसाम संघाने विजेतेपद मिळविले होते.
म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे संपलेल्या स्पर्धेत मुलांच्या गटाच्या अंतिम फेरीत उत्तर प्रदेश संघाने विनायक व शौर्य कुमार यांच्या दमदार कामगिरीच्या जोरावर झारखंड संघाला ८-३ असे पराभूत केले. विनायकने ४ (१०, १५, १८ व १९ मिनिट), शौर्य कुमारने ३ (८, ९ व १३ मिनिट) व आदित्यकुमारने १ (२ मिनिट) गोल करताना संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. झारखंड संघाकडून एमोन म्रीधा (१ मिनिट), अबीर बाग (७ मिनिट) व ओव्हीयन कश्यप (१९ मिनिट) यांनी प्रत्येकी १ गोल केला. मध्यंतराला उत्तर प्रदेश संघाने ३-२ अशी आघाडी घेतली होती.
तत्पूर्वी, मुलांच्या गटाच्या उपांत्य फेरीत झारखंड संघाने तामिळनाडू संघावर ६-२ अशी मात केली. मध्यंतराला झारखंड संघाने ४-२ अशी आघाडी घेतली होती. झारखंड संघाकडून अबीर बागने ४ (१, ३, १४ व १५ मिनिट) तर ओव्हीयन कश्यपने २ (६ व ७ मिनिट) गोल करताना संघाला अंतिम फेरी गाठून दिली.
दुसऱ्या उपांत्य लढतीमध्ये उत्तर प्रदेश संघाने संघाने आसाम संघाला ८-५ असे पराभूत केले. मध्यंतराला उत्तर प्रदेश संघाने ५-३ अशी आघाडी घेतली होती. उत्तर प्रदेश संघाकडून शौर्यकुमार ३ (३, ७ व १२ मिनिट) व आदित्यकुमारने ३ (२, ३, १३ मिनिट) तर अक्षित बाघाल (१ मिनिट) व विनायक (१० मिनिट) यांनी प्रत्येकी १ गोल केला. आसाम संघाकडून अद्रीझ नझीरने ३ (२, ५, १२ मिनिट) तर अंतरीक्ष गोहीनने २ (७ व १४ मिनिट) गोल करताना लढत देण्याचा प्रयत्न केला.
China Open 2024 : भारताच्या मालविका बनसोडनं चीन ओपनमध्ये केला मोठा उलटफेर….
विजेत्या-उपविजेत्या संघाना चषक देवून गौरविण्यात आले. यावेळी भारतीय रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष तपन आचार्य, उपाध्यक्ष मनोजकुमार यादव, सचिव चेतन भांडवलकर, महाराष्ट्र रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, रोलबॉलचे जनक राजू दाभाडे, पुणे रोलबॉल संघटनेचे अध्यक्ष गजानन थरकुडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.