“पीएसआय’ पदाच्या परीक्षेत विजय बनसुडे राज्यात पहिले

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निकाल जाहीर

 

पुणे – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दि. 24 डिसेंबर 2017 रोजी घेण्यात आलेल्या खाते अंतर्गत पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. यात विजय बनसुडे हे राज्यात पहिले आले आहेत.

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा म्हणजेच पोलीस खातेंतर्गत झालेल्या पीएसआय पदासाठी शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या परीक्षेस राज्यभरातून पोलीस दलातील 4 हजार 529 उमेदवार बसले होते. त्यापैकी 1 हजार 451 उमेदवार शारीरिक चाचणीसाठी पात्र ठरले होते. त्यांची शारीरिक चाचणी आयोगाकडून दि. 24 फेब्रुवारी 2020 ते 15 जानेवारी 2021 या कालावधीत पुणे, नाशिक, मुंबई, औरंगाबाद, अमरावती व नाशिक येथे घेण्यात आली होती.

या अंतिम निकालात पात्र न ठरलेल्या ज्या उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करावयाची आहे, त्यांनी गुणपत्रके प्रोफाइलमध्ये पाठविल्याच्या दिनांकापासून 10 दिवसांत आयोगाकडे ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्‍यक आहे. त्याची सविस्तर सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

जुन्याच पद्धतीने वैयक्‍तिक मुलाखती

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा (मुख्य) परीक्षेतून मुलाखतीस पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती “गट चर्चेद्वारे’ घेण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली होती. तथापि, गट चर्चेसंदर्भात अनेक उमेदवारांकडून प्राप्त आक्षेप विचारात घेता, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षेसंदर्भात वैयक्‍तिक मुलाखतीऐवजी गटचर्चेबाबत घोषणेवर पुनर्विचार करण्यात आला. त्यानंतर या पदासाठी मुलाखती या जुन्याच पद्धतीने म्हणजेच वैयक्‍तिक मुलाखती स्वरुपात आयोजित करण्यात येणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.