स्टंटबाजी अंगलट; भिडे पुलावरुन तरुण वाहून गेला

पुणे – बाबा भिडे पुलावर स्टंटबाजी करत पाण्यात उडी मारणाऱ्या दोघांपैकी एक जण पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. स्टंटमुळे वाहत्या पाण्यात बुडल्याची ही दुसरी घटना आहे.

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार प्रकाशसिंह श्रीभवन लोहरा (वय 20, रा. उत्तराखंड) आणि असिम अशोक उकील (वय 18, रा. कलकत्ता) असे दोघे तरुण सायंकाळी साडेपाचच्या सुमारास भिडे पुलाजवळ आले होते. दोघांची पाण्यात उडी मारून पलिकडे निघण्याची पैंज लागली. दोघांनी उडी मारल्यावर असिम बाहेर आला मात्र प्रकाश बेपत्ता झाला. नागरिकांनी तातडीने याची माहिती अग्निशमन दलाला दिली. दरम्यान, नदीपात्रालगत विसर्जनासाठी असलेल्या जवानांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो हाती लागला नाही. दोघेही तरुण नारायण पेठेतील “दावत ए कबाब’ या हॉटेलमध्ये कामास आहे.

धरणसाखळीत संततधार पावसामुळे खडकवासला धरणातून 18 हजार 500 क्‍युसेकने पाणी प्रवाह नदीपात्रात सोडण्यात येत आहे. नदीपात्रात पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी प्रकाश व असिमने पुलावरुन उडी मारण्याची शर्यत लावली होती. प्रकाश हा 3 ते 4 महिन्यांपासून मयूर पांडे यांच्या “दावत ए कबाब’ हॉटेलमध्ये कामाला आहे. येथे त्याचा मोठा भाऊही कामाला आहे. हॉटेल सायंकाळी 5 नंतर उघडते. हॉटेल उघडण्याअगोदर हे दोघे भिडे पुलावर गेले होते. प्रकाशच्या मागे आई आणि दोन भाऊ आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.