कानपूर – श्रेयस अय्यरने कसोटी पदार्पणात फटकावलेले शतक व त्याला योग्य साथ देत रवींद्र जडेजा आणि रवीचंद्रन अश्विन यांनी दिलेल्या साथीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत आपल्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी सर्वबाद 345 धावा केल्या. न्यूझीलंडनेही भारताला दमदार प्रत्युत्तर देताना शुक्रवारी खेळ थांबला तेव्हा बिनबाद 129 धावा केल्या. विल यंग 72 तर, टॉम लॅथम 50 धावांवर खेळत आहेत. न्यूझीलंडचा संघ अद्याप 216 धावांनी पिछाडीवर आहे.
न्यूझीलंडचे सलामीवीर फलंदाज टॉम लॅथम आणि विल यंग यांनी भारताच्या सर्वच गोलंदाजांवर वर्चस्व राखले. या दोघांनीही आपापली अर्धशतके थाटात पूर्ण केली. अर्थात शुभमन गिलने लॅथमला दिलेले जीवदान महागात पडले. त्याने यंगच्या साथीत संघाचे अर्धशतक फलकावर लावले. खेळ थांबला तेव्हा यंग 75, तर लॅथम 50 धावांवर नाबाद आहेत. भारताने या डावात पाचही प्रमुख गोलंदाज वापरून पाहिले मात्र, त्यांना न्यूझीलंडचा एकही बळी मिळवता आला नाही.
लक्षवेधी
– न्यूझीलंडची भारताविरुद्ध तिसऱ्या क्रमांकाची शतकी सलामी
– यापूर्वी रिचर्डसन व विन्सेंटची 231 धावांची सलामी
– मॅथ्यु हॉर्न व स्टेड यांची 131 धावांची सलामी
– लॅथम विरुद्ध बादचा निर्णय तब्बल तीनवेळा ओव्हरटर्न झाला
त्यापूर्वी, गुरूवारच्या 4 बाद 258 धावांवरून पुढे खेळ सुरु झाल्यावर रवींद्र जडेजा 50 धावांवर लगेचच परतला. त्यानंतर आलेल्या वृद्धिमान साहानेही निराशा केली. मात्र, अय्यर शतकाच्या जवळ आलेला असताना रवीचंद्रन अश्विनने त्याला सुरेख साथ देत संघाचे त्रिशतक फलकावर लावले. अय्यर शतक पूर्ण झाल्यावर लगेच बाद झाला. मात्र, अश्विनने उमेश यादवच्या साथीत संघाला 345 धासंख्या उभारून दिली. न्यूझीलंडकडून टीम साउदीने पाच गडी बाद केले. काएल जेमिसनने 3 तर, एजाज पटेलने 2 गडी बाद केले.
अय्यरचे पदार्पणात विक्रमी शतक
मुंबईचा गुणवान फलंदाज श्रेयस अय्यरने पदार्पणाच्या कसोटीत विक्रमी शतकी खेळी केली. अय्यरने न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर येथे सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात दुसऱ्या दिवशी 13 चौकार आणि 2 षटकारांसह 105 धावांची खेळी केली. पदार्पणाच्या कसोटीत शतक करणारा अय्यर हा भारताचा 16 वा फलंदाज आहे. तर कसोटी पदार्पणात शतक साकार करणारा तो तिसरा मुंबईकर खेळाडू ठरला. यापूर्वी हिटमॅन रोहित शर्मा आणि पृथ्वी शॉ यांनी अशी कामगिरी केली आहे.
अश्विनची जीगर
अश्विनने अय्यर बाद झाल्यावर उमेश यादवला साथीला घेत भारताला सुस्थिती प्राप्त करुन दिली. एजाज पटेलच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफळा उडावा मात्र, त्यापूर्वी त्याने 56 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने 38 धावांची खेळी केली.
अय्यर-जडेजाची भक्कम भागीदारी
भारताचा डाव 4 बाद 145 असा संकटात सापडलेला असताना श्रेयस अय्यर व रवींद्र जडेजा यांनी खराब चेंडूंवर मोठे फटके तर चांगल्या चेंडूंना आदर दाखवताना पाचव्या गड्यासाठी 121 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. जडेजा 50 धावंवर बाद झाल्यावर ही भागीदारी संपूष्टात आली.
साउदीचे पाच बळी
न्यूझीलंडच्या गोलंदाजीवर भारतीय फलंदाज न डगमगता खेळत होते. त्यावेळी त्यांचा प्रमुख गोलंदाज टीम साउदीकडे चेंडू सोपवण्यात आला. त्याने आधी चेतेश्वर पुजाराला बाद केले होते. नंतरच्या स्पेलमध्ये त्याने जडेजाला बाद करत जोडी फोडली. त्यानंतर त्यानेच शतकवीर अय्यरलाही तंबूचा रस्ता दाखवला. वृद्धिमान साहा व अक्सर पटेललाही बाद करत त्याने या डावात 5 बळी घेण्याची कामगिरी केली.
यंग-लॅथमने सतावले
न्यूझीलंडचा डाव सुरु झाला तेव्हा खेळपट्टीवर दव होते. तसेच थं वारे वाहात असल्याने भारतीय गोलंदाजांना खेळपट्टीच्या मदतीसह स्विंगही मिळेल असे वाटले. मात्र, त्यांची ही अपेक्षा फेल ठरली. न्यूझीलंडचे सलामीवीर विल यंग व टॉम लॅथम यांनी भारताच्या संमिश्र माऱ्याचा धैर्याने सामना केला व हे गोलंदाज थकल्यानंतर त्यांनी आक्रमक फलंदाजी करत आपापली अर्धशतके पूर्ण केली. यंगने नाबाद 75 धावांच्या खेळीत 180 चेंडूंचा सामना करताना 12 चौकार फटकावले. लॅथमनेही योग्य साथ देत आपल्या अर्धशतकी खेळीत 165 चेंडूत 4 चौकार मारले.
न्यूझीलंडची निगेटिव्ह गोलंदाजी
न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन खरेतर जागतिक क्रिकेटमधील एक अत्यंत खिलाडूवृत्तीचा व संयमी क्रिकेटपटू म्हणून ओळखला जातो. मात्र, भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत त्याने आपल्या फिरकी गोलंदाजांना लेग स्टम्पच्या बाहेर (निगेटिव्ह गोलंदाजी) गोलंदाजी करण्यात सांगितले. हे घडल्यावर पंच नीतीन मेनन व वीरेंद्र शर्मा यांनी विल्यमसनला ताकीद दिली व अशी गोलंदाजी करायला सांगणे हे शोभणारे नाही, अशी समजही दिली. कोणताही फलंदाज आक्रमक फलंदाजी करू नये यासाठी अशी गोलंदाजी केली जाते व अखेर नैराश्यात फलंदाजाकडून चूक होते व तो बाद होतो. मात्र, अशा गोलंदाजीवर जागतिक क्रिकेटमध्ये सातत्याने टीका होत असतानाच विल्यमसनचे हे वर्तन त्याच्या व्यक्तिमत्त्वाला मारक ठरले.
संक्षिप्त धावफलक –
भारत पहिला डाव – 111.1 षटकांत सर्वबाद 345 धावा. (श्रेयस अय्यर 105, शुभमन गिल 52, रवींद्र जडेजा 50, रवीचंद्रन अश्विन 38, अजिंक्य रहाणे 35, चेतेश्वर पुजारा 26, उमेश यादव नाबाद 10, टीम साउदी 5-69, काएल जेमिसन 3-91, एजाज पटेल 2-90). न्यूझीलंड पहिला डाव – 57 षटकांत बिनबाद 129 धावा. (विल यंग खेळत आहे 75, टॉम लॅथम खेळत आहे 50).