#INDvENG : भारतीय फिरकीसमोर इंग्लंडचा गरबा

पाहुण्यांचा पहिल्या डावात 112 धावांत खुर्दा : अक्‍सर पटेलचे 6 तर, अश्‍विनचे 3 बळी

अहमदाबाद  –फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर भारतीय फिरकी गोलंदाजांच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव केवळ 112 धावांवर संपुष्टात आला. डावखुरा फिरकी गोलंदाज अक्‍सर पटेलने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना सहा गडी बाद केले. त्याला सुरेख साथ देताना अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्‍विन याने 3 तर आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेल्या वेगवान गोलंदाज इशांत शर्माने 1 गडी बाद केला. पहिल्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने आपल्या पहिल्या डावात 3 बाद 99 धावा केल्या असून ते अद्याप 13 धावांनी पिछाडीवर आहेत.

भारताच्या पहिल्या डावाची सुरुवातही निराशाजनक झाली. फलकावर 34 धावा असताना दोन गडी बाद झाले होते. सलामीवीर शुभमन गिल 11 धावांवर परतला तर, संयमी चेतेश्‍वर पुजाराला खातेही उघडता आले नाही. त्यानंतर मात्र, रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली यांनी तिसऱ्या गड्यासाठी 64 धावांची भागीदारी केली व संघाचा डाव सावरला. दरम्यान रोहितने अर्धशतक पूर्ण केले. त्याला एक जीवदान मिळाले. दुसरीकडे कोहलीलाही 24 धावांवर जीवदान मिळाले; मात्र त्याला त्याचा लाभ घेता आला नाही. दिवसातील अखेरचे षटक सुरू होण्यापूर्वी तो बाद झाला व संघ पुन्हा अडचणीत आला. खेळ थांबला तेव्हा रोहित 57 धावांवर खेळत असून त्याला साथ देत अजिंक्‍य रहाणे 1 धावेवर खेळत आहे.

तत्पूर्वी, इंग्लंडचा कर्णधार ज्यो रूटने नाणेफेक जिंकत ठणठणीत खेळपट्टी पाहून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र, डावातील तिसऱ्याच षटकांत इशांतने डॉमनिक सिबलीला रोहित शर्माकरवी झेलबाद करत शंभराव्या कसोटीत पहिला बळी घेतला. त्यानंतर कर्णधार विराट कोहलीने पहिली काही षटके इशांत व जसप्रीत बुमराहला दिल्यानंतर फिरकी गोलंदाजांच्या हाती चेंडू सोपवला. त्याला हवा तसा परिणाम दिसून आला. अक्‍सर पटेल व अश्‍विन यांनी इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राऊली वगळता एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर स्थिरावू दिले नाही. त्यांचा भरात असलेला कर्णधार रूट देखील पुन्हा एकदा अपयशी ठरला. त्यांचे केवळ चारच फलंदाज दोन अंकी धावा करू शकले.

जगातील सर्वात मोठ्या व बुधवारी सामन्यापूर्वीच नामकरण करण्यात आलेल्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर सुरू झालेल्या या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने निर्विवाद वर्चस्व राखले. क्राऊलीने मात्र अत्यंत आत्मविश्‍वासाने फलंदाजी करत या खेळपट्टीवर संयमी खेळ केला तर धावा होतात हेच दाखवून दिले. त्याने एका बाजूने किल्ला लढवताना अर्धशतकी खेळी केली. त्यामुळेच इंग्लंडला धावांचे शतक फलकावर लावता आले.

क्राऊलीने 84 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 53 धावांची खेळी केली. मात्र, त्याला समोरून एकाही फलंदाजाने साथ दिली नाही. क्राऊली वगळता कर्णधार रूट 17, बेन फोक्‍स 12 व जोफ्रा आर्चर 11 यांनाच केवळ दोन अंकी धावा करता आल्या. सामन्याचे पहिले सत्र संपले तेव्हा इंग्लंडच्या 4 बाद 81 अशी अवस्था झाली होती. त्यानंतरही त्यांचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत गेले.

संक्षिप्त धावफलक –

इंग्लंड पहिला डाव – 48.4 षटकांत सर्वबाद 112 धावा. (जॅक क्राऊली 53, ज्यो रूट 17, बेन फोक्‍स 12, जोफ्रा आर्चर 11, अक्‍सर पटेल 6-38, रवीचंद्रन अश्‍विन 3-26, इशांत शर्मा 1-26).
भारत पहिला डाव – 33 षटकांत 3 बाद 99 धावा. (शुभमन गिल 11, विराट कोहली 27, रोहित शर्मा खेळत आहे 57, अजिंक्‍य रहाणे खेळत आहे 1, जॅक लिच 2-27, जोफ्रा आर्चर 1-27).

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.