बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी 77 ठिकाणी राबवणार मोहीम
पुणे – परदेशातून हजारो मैलांचा प्रवास करून आशिया खंडात येणाऱ्या पक्ष्यांच्या प्रवासमार्गांच्या सखोल अभ्यासासाठी पर्यावरण मंत्रालयाने विशेष कराराला परवानगी दिली आहे. बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) संस्थेकडून 17 राज्यांतील 77 ठिकाणांवर हा अभ्यास केला जाणार असून,
स्थलांतरित पक्ष्यांचे प्रकार, आगमनाचा कालावधी, रहिवास, मार्ग, हवामान बदलामुळे होणारा परिणाम अशा विविध घटकांचा अभ्यास यामध्ये केला जात आहे. युरोपातून स्थलांतर करून आशिया खंडात मोठ्या प्रमाणात पक्षी येतात. आशिया खंडातील “सेंट्रल एशियन फ्लायवे’ हा पक्ष्यांच्या मार्गक्रमणिकेवरील सर्वात मोठा मार्ग मानला जातो. या “फ्लायवे’चा बहुतांश भाग हा भारतातून जात असल्याने या मार्गाचा अधिकाधिक अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मत सोसायटीच्या अभ्यासकांकडून व्यक्त करण्यात आले आहे. याबाबत केंद्राकडे प्रस्तावदेखील पाठवण्यात आला होता. त्याला नुकतीच मंजुरी मिळाल्याची माहिती संस्थेचे संचालक दीपक आपटे यांनी दिली आहे.
या अभ्यासासाठी साधारणत: तीन वर्षांचा कालावधी लागणार असून, सुमारे 3.9 कोटी रुपये खर्च होणार आहेत. देशातील 17 राज्यांतील 77 ठिकाणांवर हा अभ्यास होणार आहे. यामध्ये 46 पाणथळ आणि 31 गवताळ प्रदेश, वने यासारख्या ठिकाणांचा समावेश आहे. यामुळे पक्ष्यांच्या मार्गांची सविस्तर माहिती मिळण्यास मोठी मदत मिळणार आहे.
विमानांसाठीही होणार फायदा
या अभ्यासामुळे विमान कंपन्यांनादेखील मोठा फायदा होणार आहे. यामुळे पक्ष्यांच्या मार्गाची योग्य माहिती मिळाल्याने विमानांच्या उड्डाणासाठी अशा मार्गांचा वापर टाळता येणार असल्याचेही आपटे यांनी सांगितले.