लक्षवेधी : अभ्यासोनि प्रकटावे

-राहुल गोखले

राजकारण या विषयातही अभ्यासाला खूपच महत्त्व आहे. भाषण करताना किंवा संसदेत, विधानसभेत पुढाऱ्यांना आपले मत मांडतांना मुद्देसूद आणि अभ्यासपूर्ण विषय मांडवा लागतो. यावेळी अपूर्ण माहिती किंवा चुकीची माहिती नजरचुकीने सांगितली गेली तरी विरोधकांच्या हातात आयतेच कोलित मिळते. तेव्हा अभ्यासोनि प्रकटणे किती महत्त्वाचे आहे, हे लक्षात येते.

प्रयोग कितीही हातखंडा असला तरी तो पुरेसे भान ठेवून केला नाही तर त्याचा विचका होऊ शकतो. राहुल गांधी यांनी पुदुच्चेरी येथे मच्छिमारांसमोर बोलताना केंद्रात कृषी मंत्रालय आहे तर मच्छिमारांसाठी स्वतंत्र मंत्रालय का नाही, असा सवाल उपस्थित केला. हा सवाल कितीही टाळ्याखाऊ असला तरी त्या सवालात तथ्य नव्हते कारण असे मंत्रालय गेल्या वर्षी अस्तित्वात आले आहे. तेव्हा राहुल गांधी जाणूनबुजून चुकीची माहिती पसरवत आहेत की त्यांच्यापाशी माहितीचा अभाव आहे अशी टीका लगेचच भाजप नेते आणि समर्थकांकडून करण्यात आली. ते स्वाभाविकही होते. पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकांच्या उंबरठ्यावर आहे आणि तेथे राहुल यांनी अशी दिशाभूल करणारी विधाने करणे भारतीय जनता पक्षाला रुचणारे नाही. मात्र, यावरून राहुल आणि कॉंग्रेस यांची शोभा झाली आणि प्रमुख विरोधी पक्षाच्या नेत्याला वास्तवाची जाणीव नसावी याची खिल्लीही उडविली गेली.

नरेंद्र मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले आणि त्यांनी लक्षावधी रुपयांचा सूट चढविला तेव्हा राहुल गांधी यांनी त्यावर खरमरीत टीका केली होती आणि हे सरकार म्हणजे “सूट बूट की सरकार’ आहे अशी टीकेची राळ उठविली होती. मोदी यांनी आपण चहा विक्रेत्याचे पंतप्रधान कसे झालो यावर सतत भर दिला होता आणि त्या पार्श्‍वभूमीवर राहुल यांची ती टीका भाजपच्या जिव्हारी लागणे स्वाभाविक होते कारण त्याने सरकारच्या प्रतिमेवर परिणाम होणार होता. साहजिकच भाजप नेतृत्व काहीसे बचावात्मक पवित्र्यात गेले होते. तथापि केवळ दोन चार शब्दांच्या घोषणेने दरवेळीच इप्सित साधता येत नसते.

बिहारच्या निवडणुका असोत की आताचे अर्थसंकल्पीय अधिवेशन असो; कधीतरी प्रकट व्हायचे आणि एखादी चमत्कृतीपूर्ण घोषणा सरकारविरुद्ध द्यायची हे त्यांच्या कार्यशैलीचे व्यवच्छेदक लक्षण झाले आहे. त्यामुळेच संसदेत त्यांनी मोदी सरकारवर “हम दो, हमारे दो’ अशी टीका केली आणि शेतकरी आंदोलनात ज्यांनी प्राण गमावले त्यांच्यासाठी दोन मिनिटे मौन पाळले; तरीही त्याचा फारसा परिणाम जनमानसावर झाला नाही. कधी “घर घर मोदी’ या भाजपच्या घोषणेचे विडंबन “अरहर मोदी’ असे करण्याची घोषणा; कधी काळा पैसा बाहेर यावा म्हणून मोदी सरकारने केलेल्या योजनेवर “फेयर अँड लव्हली स्कीम’ म्हणून केलेली टीका; कधी जीएसटीला “गब्बर सिंग टॅक्‍स’ म्हणून उठवलेली राळ असे प्रासंगिक प्रयोग करून राजकारणाची रंगभूमी जिंकता येत नाही.

अखेरीस विरोधक तेव्हाच प्रभावी असतात जेव्हा प्रत्येक व्यासपीठावर ते सरकारला तर्काने धारेवर धरतात. अर्थात त्यासाठी नेत्याचा अभ्यास हवा आणि त्या जोडीला मैदानात उतरून मेहनत करण्याची तयारी हवी. भाजप वर्षानुवर्षे विरोधी बाकांवर होता. मात्र वाजपेयी यांच्यापासून त्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी कधीही अशी बिनबुडाची विधाने केली नाहीत किंवा आपल्या विधानांनी ते हास्यास्पद देखील ठरले नाहीत. असे सांगतात की संसदेत भाषण करायचे तर वाजपेयी त्यातील प्रत्येक मुद्‌द्‌यांचा स्वतः धांडोळा घेत, स्वतः टिपणे काढीत आणि मग तयारीने भाषण करीत.

भाषणात आकर्षक घोषणा असल्या तर भाषण चटकदार होते हे खरे; पण केवळ अशा चारदोन शब्दांच्या उपरोधिक घोषणांवर भाषणे टिकाऊ होत नाहीत. अर्थसंकल्पावर संसदेत चर्चा सुरू असताना राहुल शेतकरी आंदोलनावर बोलले; त्या चर्चेला वेळ दिला नाही म्हणून निषेध हे पाऊल त्यांनी उचलले असे क्षणभर मानता येईलही; पण त्या भाषणात देखील अभ्यासाचा अभावच प्रकर्षाने दिसला. केवळ “हम दो, हमारे दो’ ही घोषणाच काय ती लोकांच्या लक्षात राहिली. भाषणात ऐवज नसेल; टीकेला तर्क नसेल तर अशा घोषणा हवेत विरून जायला वेळ लागत नाही.

वास्तविक केंद्रातील भाजप सरकारला फैलावर घेता येईल असे अनेक ज्वलंत मुद्दे विरोधकांपाशी सध्या आहेत आणि मुख्य म्हणजे ते व्यापक जनहिताचेही आणि सामान्यांचा जिव्हाळ्याचे आहेत. शेतकरी आंदोलनाला कॉंग्रेसने पाठिंबा दिला; मात्र, राहुल गांधी यांनी काही ट्रॅक्‍टर रॅलीत भाग घेण्यापलीकडे काही केले असे दिसले नाही. मात्र, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी शेतकऱ्यांविषयी सातत्याने सहानुभूती दर्शविली आणि आता पंजाबात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत कॉंग्रेसने घवघवीत यश मिळविले. मात्र, संसदेत यावरून राहुल यांनी सरकारला कोंडीत पकडणारे भाषण केल्याचे ऐकिवात नाही. इंधनाचे भाव चढते आहेत आणि सामान्य जनता जेरीस आली आहे. मोदींनी याचेही खापर यूपीए सरकारवरच फोडले आहे. मात्र विरोधी पक्षाचा नेता म्हणून पूर्ण माहितीसकट त्या आरोपाचे खंडन करण्यात राहुल आघाडीवर आहेत असे दिसले नाही. प्रश्‍न भाषणाची शैली काय हा नसून त्या भाषणात काही ऐवज आहे का हा आहे. असे मुद्दे असून देखील कॉंग्रेसला आणि विशेषतः राहुल गांधी यांना अभ्यासांती प्रकटावे असे वाटत नसेल तर भाषणात नाऱ्यांची आतषबाजी होईल; पण आतषबाजी संपली की त्याचा प्रभावदेखील संपेल. “सूट बूट की सरकार’ या टीकेने प्रभाव टाकला याचे कारण त्यावेळी भाजपच्या गरिबांचे सरकार असलेल्या दाव्यावर तो वर्मी घाव होता आणि दुसरे म्हणजे त्यावेळी केंद्रात मोदी आणि त्यांचे सरकार सरावलेले नव्हते. मात्र तोच हातखंडा प्रयोग नंतर कधीही गेल्या पाच सहा वर्षांत लक्ष्यभेद करणारा ठरलेला नाही.

याचे कारण एक तर त्या घोषणांना आशयपूर्ण भाषणांचा आधार नाही आणि दुसरे म्हणजे त्या विधानांत वास्तवता नाही. या दोन्ही दोषांमुळे सरकारवर शरसंधान करायला पोषक परिस्थिती असताना देखील सरकारला बचावात्मक पवित्रा घेण्याची वेळ येत नाही. भाषणातील फटकेबाजीचे कौतुक तेव्हाच असते जेव्हा त्यात काही चिंतन आणि वस्तुनिष्ठपणा असतो. “अभ्यासोनि प्रकटले’ नाही तर “प्रकटोनि नासावे’ अशी स्थिती होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.