अकोले येथे वन्यजीव प्राण्यांची तहान भागविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केले पाणवठे

अकोले  – वन्यजीवांसाठी रा. से. यो.च्या विद्यार्थ्यांनी साम्रद येथील सांदणदरीत श्रमदान करून पाणवठे तयार केले. हे पथदर्शी काम विद्यापीठस्तरावर ऐतिहासिक घटना म्हणून ठरणार आहे.
महाराष्ट्रातील काश्‍मीर म्हणून भंडारदरा व कळसूबाई परिसर पाहिला जातो. निसर्गाचा अद्‌भुत नजारा म्हणजे साम्रद येथील सांदणदरी होय.

या दरीचा विशेष नामोल्लेख होतो तो अशिया खंडातील दोन नंबरची दरी म्हणून. अशा या निसर्ग व सौंदर्य आस्वादासाठी देशातील व परदेशातील पर्यटकांची नेहमी गर्दी असते. पण या पर्यटकांमुळे येथे प्रचंड प्लॅस्टिकचा ढीग साचत आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थ व्यथित आहेत.

वन्यप्राण्यांना होणारा त्रास लक्षात घेता अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे भंडारदरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी विद्यालयाचे प्राचार्य दिलीप रोंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली साम्रद व सांदणदरी परिसरात स्वच्छता केली. कचऱ्याची विल्हेवाट लावली. उन्हाळ्यात वन्यप्राण्यांना होणारा पाण्याचा तुटवडा लक्षात घेता स्वयंसेवकांनी सांदणदरीत विविध ठिकाणी पाणवठे तयार केले. उन्हाळ्यात पशुपक्ष्यांना त्या ठिकाणी पाणी पिता येईल हा यामागे हेतू राहिला. वनक्षेत्र अधिकारी डी. डी. पडवळे, गुलाबराव दिवे, प्राचार्य दिलीप रोंगटे, राजेंद्र चव्हाण, प्रा. महेश पाडेकर, प्रा. अनसूया वाळेकर, सरपंच मारुती बांडे, उपसरपंच प्रा. त्र्यंबक बांडे यांचे मार्गदर्शन लाभले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.