महापालिकेची उदासनिता ः पावसाचे दोन महिने संपले तरीही रेनकोट नाही
रेनकोटचे तातडीने वाटप – शिंदे
काही तांत्रिक अडचणीमुळे शालेय साहित्य उशिरा प्रशासनाला प्राप्त झाले. मात्र, शाळांमध्ये रेनकोट वाटप सुरू आहे. कामामध्ये गती आणून वाटप त्वरित पूर्ण केले जाईल. असे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन अधिकारी ज्योत्सना शिंदे म्हणाल्या.पालकांचा संताप
महापालिकेच्या शाळेत गरीब, गरजू कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेतात. शालेय साहित्य पालिकेमार्फत देण्यात येते त्यामुळे पालक हे साहित्य मिळण्याची प्रतिक्षा करतात त्यामुळे विद्यार्थ्यांना रेनकोट, बूट अशा प्रकारचे साहित्य वेळेवर मिळणे अपेक्षित असते. मात्र, प्रशासनाच्या लालफितीच्या कारभारात विद्यार्थ्यांकडे पाठ फिरवली जाते. शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असूनही रेनकोट वाटप पूर्ण झाले नसल्याने पालकांनी संताप व्यक्त केला आहे.
पिंपरी, दि. 7 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना यंदाही प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला आहे. पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटले आहेत. जून महिन्यामध्ये शाळा सुरू झाल्यावर पहिल्या आठवड्यामध्ये विद्यार्थ्यांना रेनकोट मिळणे अपेक्षित होते. मात्र ऑगस्ट उजाडला असूनही महापालिका शाळांमध्ये रेनकोट पोहोचले नाहीत.
त्यातच गेल्या दोन आठवड्यांपासून शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याने विद्यार्थ्यांना भिजतच शाळेत पोहोचावे लागत असून, पालकांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 105 शाळा असून अद्याप 70 हून अधिक शाळांमध्ये रेनकोट वाटप झालेले नाही. महापालिकेच्या शाळा सुरू होऊन दीड महिना उलटला असून, शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून आलेल्या पुस्तकांचे वाटप झाले आहे. मात्र, महापालिकेमार्फत मिळणारे शालेय साहित्य विद्यार्थ्यांना अद्याप मिळू शकलेले नाही.
दरवर्षी शाळा सुरू होताच महापालिकेमार्फत गणवेश, बूट, वह्या, रेनकोट असे शालेय साहित्य देण्यात येते. मात्र, यंदा शालेय साहित्य वाटपासंबंधीची निविदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला आहे. ही निविदा प्रक्रिया वेळेवर उरकून विद्यार्थ्यांची सोय करणे महापालिका प्रशासनाची जबाबदारी होती. मात्र याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करण्यात आले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी त्यांना रेनकोट वाटप करणे आवश्यक होते. मात्र पावसाळ्याचे दोन महिने संपले असूनही महापालिका प्रशासनाची रेनकोट वाटप संथगतीने सुरू आहे. पालिकेच्या 105 शाळा असून अद्याप 70 हून अधिक शाळांमध्ये रेनकोट वाटप झालेले नाही