बेल्हे- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट राजुरी संचलित समर्थ शैक्षणिक संकुलात मराठी भाषा दिनानिमित्त विविध उपक्रम राबविण्यात आले. यावेळी विद्यार्थी- विद्यार्थिनींकडून ग्रंथ प्रदर्शनातून मायमराठीच्या गौरवपूर्ण इतिहासाला उजाळा देण्यात आला. यावेळी जुन्या चालीरिती, शेतशिवारातील गीते, अन्य उपक्रमांनी संपूर्ण समर्थ संकुल मराठीमय झाले होते.
संस्थेच्या संचालिका सारिका शेळके म्हणाल्या की, ज्या मायमराठीने आपल्यावर सांस्कृतिक छत्र धरले. जिने आपल्याला लहानाचं मोठं केले. या बहुआयामी जगात स्वतःला सिद्ध करण्याची धमक आपल्यामध्ये निर्माण केली. आपणाला व्यक्त होण्यासाठी जिने शब्दांची पखरण केली. आज तिच्याप्रती आदर व्यक्त करण्यासाठीचा महंमंगल दिवस आहे.
समर्थ संकुलाच्या प्रवेशद्वारामध्ये फलक लावून त्यावर मराठीतून स्वाक्षरी हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी विविध पुस्तकांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी खुले करण्यात आले.मराठी भाषेचा जयघोष करीत विद्यार्थी आणि शिक्षक प्रदर्शनात सहभागी झाले. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये कथाकथन, कविता वाचन, परिच्छेद वाचन, मराठी निबंध स्पर्धा, नाट्य सादरीकरण, मराठी गाणी, मराठी अक्षर लेखन स्पर्धा आदी कार्यक्रमांमुळे रंगत आली. यावेळी जुन्या मराठी ओव्या, जात्यावरची गाणी,शेतात पेरणीची गाणी यांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी संकुलात विविध पुस्तके, साहित्य, वाङ्मयाचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.
वल्लभ शेळके यांनी मार्गदर्शन केले. यावेळी स्वयंलिखित कवितेचे सादरीकरण केले. रांगोळ्यांच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचे भान आणि संदेश देणारी कलाकृती अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी मांडली. वाचन प्रेरणादिनानिमित्त मराठी भाषा संस्कृती संवर्धनासाठी व जोपासनेसाठी मराठीतून स्वाक्षरी, निरंतन मराठी वाचन, पुस्तक भेट, कविवर्य विंदा करंदीकरांच्या जन्मशताब्दीनिमित्त सार्थ स्मरण, साहित्यिकांशी गप्पा, ई- बुक्सचे वाचन आदी उपक्रमांची रेलचेल होती.
यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके, उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके, विश्वस्त वल्लभ शेळके, अभियांत्रिकी विद्यालयाचे प्राचार्य डॉ. अण्णासाहेब गोजे, बीसीएसचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण घोलप, एमबीएचे प्राचार्य राजीव सावंत, ज्युनियर महाविद्यालयाच्या प्राचार्या वैशाली आहेर, प्रा. प्रदीप गाडेकर, विद्यार्थी विकास मंडळाचे अधिकारी प्रा. चेतन डोखे, प्रा. अमोल काळे, प्रा. दिनेश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी प्रा. सचिन शेळके, विभागप्रमुख, शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.