मंचर, (प्रतिनिधी) – दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे. त्यामुळे भविष्यात तापमान वाढीचा धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याने पर्यावरणाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मंचर येथील महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य उत्तम आवारी यांनी केले.
गणेशोत्सवानिमित्त मंचर (ता.आंबेगाव) येथील महात्मा गांधी विद्यालयात पर्यावरणपूरक मातीची गणेश मूर्ती बनविण्याच्या स्पर्धा संपन्न झाली.
मंचर नगरपंचायतद्वारे माझी वसुंधरा ५.० व स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत प्रदूषणाला आळा घालण्याच्या हेतूने नगरपंचायतीच्या वतीने राबविण्यात आलेल्या या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. मूर्तिकार विजय सोमवंशी यांनी विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती बनविण्याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
या पर्यावरण पूरक उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व आकर्षक गणेश मूर्तीना पारितोषिक देखील दिले जाणार आहेत.
गणेश भक्तांनी पर्यावरण पूरक श्री गणेश मूर्तीची स्थापना करून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपल्या घरगुती श्री गणेश मूर्तीचे विसर्जन हे नगरपंचायतीद्वारे तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदामध्ये व निर्माल्य कलश यामध्ये विसर्जित करण्याचे आवाहन मंचर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गोविंद जाधव यांच्याद्वारे करण्यात आले.