विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यावा

आ. शशिकांत शिंदे यांचे प्रतिपादन
पुसेगाव – झपाट्याने बदलणाऱ्या काळात विद्यार्थ्यांनी स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घ्यावा व स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य आ. शशिकांत शिंदे यांनी केले. पुसेगाव येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात आयोजित पालक – शेतकरी मेळाव्यास मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे होते. प्रसिद्ध उद्योजक विनायकराव काळे, माजी उपसरपंच बाळासाहेब उर्फ संतोष जाधव, सुरेशशेठ जाधव, सुनिलशेठ जाधव, माजी सरपंच बाळासाहेब जाधव, राजेद्र कचरे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ऍड. किसन खामकर, महाराष्ट्र बॅंकेच्या पुसेगाव शाखेचे मॅनेजर अरविंदकुमार सिंग, गणेश जाधव, मोहनराव जाधव, श्री. फडतरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य डॉ. कैलास जगदाळे म्हणाले, महाविद्यालयाच्या गुणवत्ता विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. परंतु, पालकांच्या सहकार्याची आम्हाला नितांत गरज आहे. त्यासाठी महाविद्यालयाच्या कामकाजात पालकांनी कृतीयुक्त सहभाग घ्यावा. कार्यक्रमात विद्यार्थी – पालक व शेतकरी बांधवांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खुली चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांना टिळक महाराष्ट्र विद्यापीठाची पीएच. डी. पदवी मिळाल्याबद्दल आ. शशिकांत शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
महाविद्यालयाच्या विकासासाठी आ. शशिकांत शिंदे यांनी पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. प्रसिद्ध उद्योजक विनायकराव काळे यांनी पंचवीस हजार रुपये तर प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी दहा हजार रुपये देणगी जाहीर केली. याप्रसंगी माजी विद्यार्थी संतोष नलवडे यांनी एक संगणक संच भेट दिला. जि. प. सदस्या सौ. सुनिता कचरे यांच्यावतीने महाविद्यालयातील शिवण क्लास कोर्ससाठी शिलाई मशीन देण्याचे जाहीर करण्यात आले. प्रास्ताविक व स्वागत प्रा. डॉ. संजय क्षीरसागर यांनी तर नियोजन प्रा. डॉ. आर. पी. भोसले यांनी केले. प्रा. सौ. सी. बी. सकटे यांनी सूत्रसंचालन आणि प्रा. सौ. एम. बी. सोनार यांनी आभार मानले.





