आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप
पुणे – “काब’ आणि “एनआरसी’ कायद्याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्याच्या तयारीत असलेल्या फर्गसन महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना डेक्कन पोलिसांनी प्रतिबंधात्मक नोटीस बजावली. मात्र, पोलिसांच्या विरोधाला झुगारत विद्यार्थ्यांनी मंगळवारी कॉलेजमध्ये मोर्चा काढत स्वाक्षरी मोहीम राबवली.
दिल्लीतील जमिया मिलिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थी सोमवारी रात्री उशिरा एकत्रित आले होते. दरम्यान, मंगळवारी फर्गसन कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी “काब’ आणि “एनआरसी’विरोधात स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले होते. मात्र, दिल्लीतील आंदोलनाला हिंसक वळण लागल्याच्या पार्श्वभूमीवर डेक्कन पोलिसांनी फर्गसन कॉलेजमधील स्वाक्षरी मोहिमेस परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्या.
फर्गसनमधील संतोष रासवे म्हणाला, “काब’ आणि “एनआरसी’विरोधात आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे ठरवले होते. त्यानुसार शनिवारी डेक्कन पोलीस ठाण्यात अर्ज दिला. त्यावेळी परवानगी देण्यात आली होती. मात्र, रविवारी दि. 15 रोजी रात्री मला पोलिसांनी बोलावून घेतले. तसेच कायदा आणि सुव्यवस्था कायम रहावी, यासाठी स्वाक्षरी मोहिमेस परवानगी नाकारली. तसेच मला आणि माझ्यासोबत आलेल्या मित्रास नोटीस बजावली. मात्र, आम्ही राज्यघटना, अभिव्यक्ती, विचार आणि संघटनाचे स्वातंत्र्य देते असे बोलून निर्णयावर ठाम राहिलो. सोमवारी विद्यार्थ्यांची बैठक घेतली त्यामध्ये विरोधाला न जुमानता शांतता मार्गाने स्वाक्षरी मोहीम राबवण्याचे ठरवले. त्यानंतर पोलिसांनी मला दुसऱ्यांदा नोटीस बजावली. तसेच गुन्हे दाखल करू, असे धमकावले.
दरम्यान, याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.