दहावी परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन केले अभिनंदन
सातारा (प्रतिनिधी) – दहावीच्या परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन खासदार श्रीनिवास पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. खासदारांच्या या अनोख्या शाबासकीने विद्यार्थी आणि पालक भारावून गेले.
पाटण तालुक्यातील गारवडे येथील साक्षी पालेकर हिला 99.40 टक्के गुण मिळवल्याची माहिती श्रीनिवास पाटील यांना मिळाली. तिच्या या यशाबद्दल तिचे अभिनंदन करण्यासाठी खा. पाटील यांनी गारवडे येथील तिच्या घरी जाऊन तिचे अभिनंदन केले. बहुले, मारूल हवेली, नावडी व पाटण येथील विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शाल, श्रीफळ, पुष्षगुच्छ देऊन व पेढा भरवून त्यांचे त्यांनी अभिनंदन केले. यावेळी त्यांच्या पालकांचाही पाटील यांनी सत्कार केला.
पाटण येथील तन्वी विजयकुमार चाळके हिने 99. 80 टक्के गुण मिळविले आहेत. तिचा सत्कार करुन पाटील यांनी तिचे अभिनंदन केले. यावेळी युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर, राजाभाऊ काळे, गणेशचंद्र पिसाळ, सचिन कुंभार आदी उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करणे, त्यांना प्रोत्साहन देणे आपले कर्तव्य आहे.
चांगले गुण मिळाले नाहीत किंवा यश प्राप्त झाले नाही त्या विद्यार्थ्यांनी खचून जाऊ नये. गणित, विज्ञान, भाषा याशिवाय इतर क्षेत्रांकडे त्यांचा कल व आवड असू शकते. हे ओळखून मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात पालकांनी प्रोत्साहन दिले पाहिजे. केवळ डॉक्टर अथवा इंजिनियरच झाले पाहिजे, असे नाही. सध्या मुलांना अनेकविध क्षेत्रात त्यांचे गुण दाखविण्याच्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे योग्य दिशेने विचार करून विद्यार्थ्यांनी आपले करिअर निवडावे.
श्रीनिवास पाटील,खासदार, सातारा.