पुणे – जय भवानी, जय शिवाजी…..हर हर महादेव….. छत्रपती शिवाजी महाराज की जय….. छत्रपती संभाजी महाराज की जय…. अशा घोषणा देत शूरवीर, महापराक्रमी, धर्मरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाची अनुभूती देणारा धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट पाहून प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल’चे विद्यार्थी,पालक भारावून गेले. चित्रपटात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका साकारणारे अभिनेते ठाकूर अनुप सिंह यांची चित्रपटगृहात अचानक एंट्री झाल्याने विद्यार्थ्यांचा आनंद व्दिगुणित झाला.
प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलचे व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ.जितेंद्र सिंह, डॉ. राजेंद्र सिंह यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्य आणि पराक्रमाची गाथा विद्यार्थ्यांना माहीत व्हावी या उद्देशाने धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट विद्यार्थ्यांना दाखविण्यासाठी पुढाकार घेतला. सलग दोन दिवस पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरातील प्रियदर्शनी शाळेतील विद्यार्थी व पालकांनी चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या संख्येने गर्दी केली.
चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थी व पालकांसाठी अभिनेता अनुप सिंग यांची अचानक झालेली भेट ही एक पर्वणी ठरली. ठाकूर अनुप सिंह यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्याबरोबर चित्रपटही पाहिला. यावेळी चित्रपटांचे निर्माते धर्मेंद्र बोरा, कार्यकारी निर्माते राहूल नेवसे, दिग्दर्शक तुषार शेलार, प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूलच्या व्यवस्थापकीय विश्वस्त डॉ. निशा सिंह आदी उपस्थित होते.
एनईपी मध्ये इंडियन नॉलेज सिस्टीमला महत्त्व देण्यात आले आहे. त्या अंतर्गत विद्यार्थ्यांना आपल्या इतिहासाची व संस्कृतीची माहिती माहिती करून देणे आवश्यक आहे. त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्याची व पराक्रमाची गाथा विद्यार्थ्यांना चित्रपटाच्या माध्यमातून पोहोचविण्याचा प्रयत्न होता, असे मत डॉ.जितेंद्र सिंह यांनी व्यक्त केले.