मराठा समाजातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्राची सक्ती नाही – विनोद तावडेंची घोषणा

प्रमाणपत्र सादर करण्यासाठी वाढवली मुदत

मुंबई – राज्यातील अभियांत्रिकी, औषधनिर्माण, हॉटेल मॅनेजमेंट, वास्तुकला या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाच्या वेळी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना एसईबीसी प्रवर्गामधील जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती केली जाणार नाही. तसेच ज्या विद्यार्थ्यांकडे अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्र नसेल, अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी घोषणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत केली. या निर्णयामुळे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

मराठा समाजातील विद्यार्थी एसईबीसी या मराठा आरक्षण प्रवर्गातून व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज दाखल करत आहेत. मात्र त्या विद्यार्थ्यांना 30 जून ही पडताळणीची अंतिम तारीख सांगण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून जातपडताळणीसाठी दाखल केलेल्या अर्जाचे टोकन ग्राह्य धरण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली. तर अजित पवार यांनी हा मुद्दा इतरही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी ग्राह्य धरावा, अशी मागणी केली. त्याला उत्तर देताना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे बोलत होते.

राज्यातील तंत्रशिक्षण अभ्यासक्रमासह अन्य व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांना पहिल्याच फेरीसाठी कागदपत्रांच्या जातपडताळणीमध्ये जातवैधता प्रमाणपत्रही सादर करण्याची सूचना काल जाहीर करण्यात आली होती. परंतु, या संदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश नियमन समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती देशमुख, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, श्रमिक, विमुक्त जाती, भटक्‍या जमाती, इतर मागास वर्ग आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण मंत्री संजय कुटे, विभागांचे सचिव यांची बैठक संपन्न झाली.

सन 2018 च्या अधिनियमानुसार मराठा समाजाचा सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्‌या मागास प्रवर्गामध्ये (एसईबीसी) समावेश करण्यात आला आहे. या प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या जातप्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता पुरेशी यंत्रणा तुर्तास उपलब्ध नाही. त्यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या एसईबीसी प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांनी संबंधित जातपडताळणी समितीकडे जातपडताळणीसाठी अर्ज दाखल केला आहे, अशा विद्यार्थ्यांस प्रवेशावेळी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची सक्ती आता करण्यात येणार नाही, असा निर्णय शासनाने घेतला आहे, असे तावडे यांनी स्पष्ट केले.

व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचीत जमाती, वि.जा.भ.ज., इ.मा.व. व विशेष मागास प्रवर्ग या सर्व प्रवर्गातील ज्या विद्यार्थ्यांकडे अर्ज सादर करताना जात वैधता प्रमाणपत्र नसेल, अशा विद्यार्थ्यांना प्रवेशाची दुसरी फेरी सुरु होण्यापूर्वी प्रवेश नियामक प्राधिकरण निश्‍चित करेल अशा दिनांकापर्यंत जात वैधता प्रमाणपत्र दाखल करण्याची मुदत वाढवून देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)