पुणे, दि. 20 – “सध्याच्या कालावधीत कोणतीही माहिती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असते. आपल्या मुलांना सोशल मीडिया साक्षरतेबाबत शिक्षित करणे काळाची गरज आहे. सोशल व्यासपीठांवर पोस्ट किंवा शेअर करण्यासाठी प्रथम असण्याबाबत चढाओढ दिसून येते आणि याच घाईमुळे माहितीची सत्यता नष्ट होते आणि खोट्या माहितीला वाव मिळतो,’ असे प्रतिपादन तळेगाव येथील पोदार इंटरनॅशनल स्कूलचे मुख्याध्यापक सुधांशू शेखर नायक यांनी केले.
“आपल्या विद्यार्थ्यांना खोट्या माहितीच्या वापरापासून परावृत्त करण्यासोबत शाळा व घरामध्ये विद्यार्थ्यांसाठी मीडिया साक्षरतेचे सादरीकरण व चालना देत जबाबदार वापरकर्ते बनण्यास प्रेरित करणे ही काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांना मीडियाचा ज्ञानी ग्राहक बनण्यास, त्यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण विचारशील कौशल्ये विकसित करण्यास, माहितीचा विश्वसनीय स्रोत मिळवण्यास आणि तर्कशुद्धपणे आपले विचार मांडण्यास मदत करणे हा माध्यम साक्षरतेचा उद्देश आहे. पालक व शाळा एकत्र काम करत उत्तम अर्थांच्या माध्यमातून मीडिया साक्षरतेला चालना देऊ शकतात,’ असेही मुख्याध्यापक नायक म्हणाले. “प्रत्येक विषयाच्या मुलभूत गोष्टींचे अध्यापन करण्यास व माहिती देण्याची आवश्यकता आहे. यामुळे त्यांना माहिती मिळण्यासोबत हे क्षेत्र किती व्यापक आहे आणि सर्व माहिती कोण तयार करतो हे समजण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना विविध मीडिया व्यासपीठांचे व्यावहारिक ज्ञान दिले पाहिजे. विद्यार्थ्यांना महत्त्वाच्या वाटणाऱ्या ठळक बातम्या शोधण्याचे आणि ऑनलाइन बातम्यांचे फोटो मिळवण्याचे देखील कार्य देता येऊ शकते. तुलनात्मक अभ्यास त्यांना त्यांच्या कृतींमध्ये किंवा समाजाप्रती जबाबदार राहण्यास मदत करू शकतो,’ असे निरीक्षण नायक यांनी नोंदवले आहे.
“माहिती नेहमी कोणत्यातरी गोष्टीशी किंवा लक्ष्य ग्राहक अथवा उद्योगाशी संबंधित असते. विद्यार्थ्यांना हे लक्ष्य समजण्यास आणि लक्ष्य ग्राहक किंवा उद्योगावर प्रभाव झाला आहे की नाही हे ओळखण्याकरिता विश्लेषण करण्यास मदत करू शकतो. मीडिया व माहिती हे समाज, संस्कृतींचे प्रतिबिंब आहे. याचा आपल्या विद्यार्थ्यांवर वयाच्या सुरूवातीच्या टप्प्यापासून प्रभाव पडू शकतो. आपल्या विद्यार्थ्यांमध्ये मीडिया साक्षरता विकसित, निर्माण करण्याप्रती पुढाकार घेणे ही पालक व शाळेची समान जबाबदारी आहे. यातून विद्यार्थी सुजाण, कुशल, हुशार, जाणकार व्यक्ती बनण्यास नक्कीच मदत होणार आहे,’ असेही मत नायक यांनी व्यक्त केले.