मंचर- शासकीय अभियांत्रिक व संशोधन महाविद्यालय अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असलेल्या मृणाल आडे व निवेदिता मेनन या विद्यार्थिनींनी आपले केस कॅन्सरग्रस्त रुग्णांसाठी दान केले आहेत. विद्यार्थिनींनी केलेले केसदान श्रेष्ठदान असून त्यांच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. कॅन्सरग्रस्त रुग्णांकडे समाजाची पाहण्याची दृष्टी वेगळी असते. तसेच कॅन्सर झाल्यानंतर रुग्णाच्या डोक्यावरील पूर्ण केस निघून जातात. त्यामुळे ते मानसिकरित्या दबावाखाली जगत असतात.
अशा कॅन्सरग्रस्त रुग्णाला पाठिंबा व दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना एक नवीन जीवन जगण्याची आशा निर्माण करण्यासाठी आपले केस कॅन्सरग्रस्त रुग्णांना दान करीत असल्याचे विद्यार्थिनींनी सांगितले. विद्यार्थिनींनी प्रशांती कॅन्सर केयर पुणे व सर्गक्षेत्र संस्था केरळ या सामाजिक संस्थाना आपले केस दान केले असून पुढील काळातही असे सामाजिक कार्य करणार असल्याचे सांगितले, अशी माहिती राष्ट्रीय सेवा योजनेचे मुख्य विद्यार्थी प्रतिनिधी अनुराग मिश्रा यांनी दिली.