#व्हिडीओ : विद्यार्थ्यांनी साकारल्या गणरायाच्या मूर्ती

चिंचवडच्या श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालयात “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ कार्यशाळा

पिंपरी – प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती नदीपात्र, विहिरीमध्ये विसर्जित केल्याने मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते. हे रोखण्यासाठी दैनिक “प्रभात’तर्फे यावर्षी “माणिकचंद’ प्रस्तुत “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या शाडूची मूर्ती बनवण्याची कार्यशाळा मंगळवारी दि. 27 रोजी पिंपरी-चिंचवड शहरातील श्री शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आली.

पाहा फोटो : विद्यार्थ्यांनी साकारल्या गणरायाच्या मूर्ती

यात इयत्ता 8 वी आणि 9 वीच्या 122 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी मोजक्‍याच साहित्याचा वापर करून शाडूच्या मातीपासून कमी वेळात आकर्षक आणि सुंदर गणेशमूर्ती साकारल्या. आपली मूर्ती अधिकाधिक आकर्षक कशी बनेल, यामध्ये सर्व विद्यार्थी मग्न होते. यावेळी मूर्ती बनवण्याचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन नितीन ठाकरे यांनी केले.

या उपक्रमामध्ये शाळेने सहभाग घेतल्याबद्दल दै. “प्रभात’च्या वतीने पिंपरी-चिंचवड कार्यालयाचे व्यवस्थापक शिरीष समुद्र यांनी शाळेचे संचालक विजय जाधव यांचा प्रशस्तिपत्र देत गौरव केला. यावेळी शाळेचे अध्यक्ष अण्णा जाधव, उपाध्यक्ष जगदीश जाधव, मुख्याध्यापक बी.व्ही. पाटील, पर्यवेक्षक डी.डी. भालेराव, शिक्षिका एल. एस. मुरकुळे, ए. जी. गुराळकर, पी.व्ही. शेटे, आर.डी. ढवळे, के.एम.अहीर, शब्बीर मोमीन, ए.बी. मुंडे आदी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

विद्यार्थी म्हणतात…
कार्यशाळेत सहभाग घेतल्यानंतर सुरुवातीला हाताने गणेशमूर्ती बनवणे अवघड वाटत होते. मात्र, प्रत्यक्ष मातीच्या वेगवेगळ्या गोळ्यापासून अगदी सहज आणि कमी वेळेत आकर्षक अशी गणेशमूर्ती बनवणे सहज शक्‍य झाले. तसेच गणपती बाप्पा बनवताना फार मजा आली. हा एक वेगळाच अनुभव असल्याच्या प्रतिक्रिया कार्यशाळेनंतर विद्यार्थ्यांनी दैनिक “प्रभात’शी बोलताना व्यक्त केल्या.

दैनिक “प्रभात’ने राबवलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळाले. दररोजच्या अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कलेची आवड निर्माण होण्यास मदत झालीच, शिवाय पर्यावरणाच्या संवर्धनाचाही संदेश दिला गेला. त्यामुळे अशी कार्यशाळा प्रत्येक वर्षी घेण्यात यावी, त्यामुळे विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व आणखी समजेल.

विजय जाधव, संचालक, श्री शिवछत्रपती शिवाजीराजे शिवाजीराजे विद्यालय

दै. “प्रभात’ने सुरू केलेल्या ग्रीन गणेशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना आपल्या हाताने बाप्पा तयार करण्याची संधी मिळाली. हा उपक्रम मुलांसाठी उत्साहवर्धक तर ठरला आहे. विद्यार्थ्यांनी बनवलेल्या आकर्षक गणेशमूर्ती जेव्हा त्यांचे पालक पाहतील, तेव्हा त्यांनाही समाधान वाटेल आणि त्यांचा आनंद देखील द्विगुणीत होईल.

– अण्णा जाधव, संस्थापक अध्यक्ष, श्री शिवछत्रपती शिवाजीराजे विद्यालय.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here