संतापजनक : विद्यार्थ्यांना गुडघे टेकून, मस्तक झुकवून करायला लावले मुख्यमंत्र्यांचे स्वागत

मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग वादाच्या केंद्रस्थानी

इम्फाळ – देशभरातील राजेशाही आणि विविध राजांच्या जुलमी प्रथांचा अंत झालेला असतानाही, आजही स्वातंत्र्याच्या 72 वर्षांनंतर पूर्वेकडील राज्यांमध्ये गुलामी मानसिकतेचा प्रत्यय देणाऱ्या रुढी परंपरा सुरु असल्याचे पाहून, तुमची तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. यावेळी अशा निंद्य घटनेला भारतीय जनता पक्षाचे नेते असलेले मणिपूरचे मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग हे वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत.

मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळमध्ये मादक द्रव्यविरोधी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सर्व जाती-धर्माच्या प्रतिनिधींनी अफू-चरस आणि गांजाच्या लागवडीला विरोध करण्याची शपथ घेतली. स्वत: मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. मात्र, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी शालेय विद्यार्थ्यांना आणण्यात आले होते. या विद्यार्थ्यांना गुडघे टेकून डोके जमिनीला लावत मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्याची सक्ती करण्यात आली. संतापजनक बाब म्हणजे, स्वत: मुख्यमंत्र्यांनी या स्वागताचा फोटो ट्‌वीट करुन, महनीय व्यक्तींच्या स्वागतावेळी या शालेय विद्यार्थ्यांनी आपली परंपरा जतन केल्याबद्दल मोठे कौतुक केले.

हे छायाचित्र ट्‌वीटरसह समाजमाध्यमांत व्हायरल झाल्यानंतर एन. बिरेन सिंग यांच्यावर टीकेचे झोड उठली आहे. परंपरागत राजेशाही मानसिकता असलेल्या या राजकीय नेत्यांनी लोकशाहीमध्ये अशा स्वागताचे कौतुक करणे हे घटनाविरोधी असल्याचे सांगितले आहे. जर मुख्यमंत्र्यांना असे स्वागत हे अभिमानास्पद वाटत असेल तर अशा व्यक्तींनी आजही राजेशाही असलेल्या थायलंडमध्ये जावे, असा सल्लाही अनेकांनी बिरेन सिंह यांना दिला आहे.

केंद्राची अथवा राज्याची मानवी हक्क परिषद आणि बाल विकास मंत्रालये काय करत आहेत? त्यांना मुख्यमंत्र्यांच्या स्वागताची ही अमानवी पद्धत मान्य आहे का अशी संतप्त विचारणाही अनेकांनी केली आहे. मणिपूरच्या विधानसभेमध्ये कॉंग्रेस विरोधी पक्ष असून ओक्राम इबोबी सिंग हे विरोधी पक्ष नेते आहेत. मात्र, त्यांनी बिरेन सिंग यांना या प्रकरणी जाब विचारलेला नाही, हे लक्षणीय आहे.

आता हा वाद निर्माण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी विद्यार्थ्यांना झुकून सलामी द्यायला कुणी सांगितले, याविषयी चौकशी सुरु झाली आहे तर भाजपा आणि मुख्यमंत्री सिंग “डॅमेज कंट्रोल’च्या मागे लागल्याचे दिसून येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.