पुणे – विद्यार्थ्यांनो, घाई करा…

पुणे – इयत्ता अकरावीसाठी पहिल्या नियमित प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना कनिष्ठ महाविद्यालयांचा प्राधान्यक्रम नोंदविण्याबाबतचा अर्जाचा भाग-2 भरण्यासाठी मुदत रविवारी (दि.22) सकाळी 11 वाजता संपणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुदतीत अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. दरम्यान, पुणे विभागात 73 हजार 700 विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी झाली आहे.
पुणे-पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील 311 कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशासाठी नोंदणी केली असून यात 1 लाख 11 हजार 405 जागा दर्शविण्यात आलेल्या आहेत. एकूण 73 हजार 700 विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे.
यातील 63 हजार 749 विद्यार्थ्यांचे अर्ज लॉक केलेले आहेत. 62 हजार 575 अर्जांची पडताळणी पूर्ण झालेली आहे. 51 हजार 261 विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा भाग-2 भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
पहिल्या नियमित प्रवेश फेरीची तात्पुरती किंवा संभाव्य गुणवत्ता यादी 23 ऑगस्ट रोजी संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे. ही सर्वसाधारण यादी असणार आहे. यात विद्यार्थ्यांना लॉगइनमध्ये जाऊन तपशील तपासता येणार आहे. त्यानंतर 25 ऑगस्ट रोजी अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर होईल.





