शैक्षणिक नुकसान भरून काढणार : विभागीय आयुक्त
पुणे – करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शाळा व महाविद्यालयांना सुट्या दिल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थी मूळ गावी जात आहेत. भविष्यात पुणे शहरातील करोना आटोक्यात आला, पण संबंधित विद्यार्थ्यांच्या राज्यात किंवा जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव असेल तर त्या विद्यार्थ्याने घरीच थांबावे. त्यादरम्यान संबंधित विद्यार्थ्याचे होणारे शैक्षणिक नुकसान भरून काढले जाईल, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसकर यांनी येथे दिली.
शहरातील करोनासंदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. म्हैसकर म्हणाले, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील वसतिगृहे रिकामे करावीत, अशा कुठल्याच सूचना दिलेल्या नाहीत. पण, जर कुठला विद्यार्थी वसतिगृह सोडून घरी जात असेल, तर त्याला अडवू नये. काही विद्यार्थी वसतिगृहाबाहेर राहत आहेत. त्यांची माहिती संबंधित विद्यापीठांनी त्वरित संकलित करावी. हे विद्यार्थी जर परदेशातील असतील, तर त्यांना गेले महिनाभरात त्यांच्या देशातून कोणी भेटायला आले होते का, याची माहिती घेऊन जर कोणी भेटायला आले असेल तर त्याबाबत खबरदारी घ्यावी.