पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने बसने प्रवास करण्याबाबत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरांतील महाविद्यालयांना साकडे घातले आहे. याबाबतचे पत्र पीएमपी प्रशासनाकडून महाविद्यालयांना देण्यात येणार आहे.
शहराची प्रमुख सार्वजनिक वाहतूक असणाऱ्या पीएमपीने प्रवासी आणि उत्पन्न वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे. याच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता, आकर्षक पास योजना, बस डे आदी उपक्रम राबवण्यात येतात. येत्या काळात बसचा अधिकाधिक होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये आवाहन करण्यात येणार आहे. याकरता महाविद्यालयांच्या परिसरात याबाबतचे फलक लावण्याच्या परवानगीची मागणी पीएमपी प्रशासनाने पत्राद्वारे महाविद्यालयांकडे केली आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील रस्ते अरूंद आणि अपुरे असल्याने होणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करणे आवश्यक आहे. यासाठी ई-बसेसदेखील दाखल झाल्या आहेत. पुढील काळात परिवहन महामंडळाच्या ताफ्यात एकूण 650 नवीन ई-बसेसची भर पडणार आहे. तर महिलांच्या सुरक्षेसाठी तेजस्विनी सुविधादेखील पुरवण्यात येते. यासह विद्यार्थ्यांना सवलतीचे पासेस देण्यात येतात.