खळबळजनक! सशस्त्र हल्ल्यानंतर शाळेतील तब्बल 400 मुले बेपत्ता

लगोस (नायजेरिया) – नायजेरियामध्ये काही शस्त्रधारी हल्लेखोरांनी मुलांच्या एका निवासी शाळेवर हल्ला केल्यानंतर शेकडो मुले बेपत्ता झाली आहेत. कंकरा जिल्हयातल्या या शाळेवर हल्लेखोरांनी शुक्रवारी रात्री हल्ला केला.

यावेळी तिथे जवळपास 600 मुले होती. हल्लेखोरांनी एके-47 च्या सहाय्यने हा हल्ला केला होता, असे कॅटसिना राज्याच्या पोलिसांचे प्रवक्ते गॅम्बो इसाह यांनी एका निवेदनात ही माहिती दिली आहे.

पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर हल्लेखोरांना माघार घ्यावी लागली. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातल्या 200 मुलांची सुटका केली, मात्र उर्वरित मुले बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. शोधमोहिमेत हवाई दलानेही सहभाग घेतला आहे.

या चकमकीदरम्यान शाळेतील काही मुले सुरक्षिततेसाठी शाळेच्या कुंपणावरून उड्या मारून पळाली. त्यांचा शोध सुरू आहे. अद्यापही 400 विद्यार्थी बेपत्ता आहेत. हल्लेखोरांनी काही मुलांना ओलीस म्हणून आपल्याबरोबर पळवून नेले असल्याचे स्थानिक रहिवाशांनी वृत्तसंस्थेला सांगितले.

नायजेरियातील शाळेवर झालेला हा सर्वात अलिकडील हल्ला आहे. यापूर्वी एप्रिल 2014 मध्ये बोको हराम या जिहादी गटाने 276 मुलींचे त्यांच्या शाळेच्या वसतीगृहातून अपहरण केले होते. त्यापैकी सुमारे 100 मुली अद्यापही बेपत्ता आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.