पुण्यात शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षण नाकारले

शहर आणि जिल्ह्यातील 7 शाळांना नोटीस : कायदेशीर कारवाईचा इशारा

पुणे – करोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण सुरू असताना, पुण्यातील काही शाळांनी शुल्क न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण बंद केले आहे. याप्रकरणी पुण्यातील सात शाळांना पुणे मनपा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शुल्काअभावी विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण थांबवल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा या शाळांना देण्यात आला आहे.

करोनामुळे शाळा बंद असल्या तरी शासनाने ऑनलाइन शिक्षणाला परवानगी दिली. त्यानुसार शाळास्तरावर ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. तसेच शाळांकडून पालकांकडे शुल्काची मागणी केली जात आहे. काही पालकांनी शुल्क न भरल्याने शाळांनी ऑनलाइन लिंक न पाठविणे अथवा ऑनलाइनसाठी आवश्‍यक असणारा पासवर्ड न देणे अशा स्वरूपाच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे केल्या होत्या. याविषयी पुणे पॅरेन्ट्‌स युनायटेड संघटनेने आंदोलनदेखील केले होते. या तक्रारींची दखल घेत शाळांना नोटीस बजावण्यात आली आहे.

गुरूवारी पुणे पॅरेन्ट्‌स संघटना आणि पालकांनी शिक्षणाधिकारी मीनाक्षी राऊत आणि जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी सुनील कुऱ्हाडे यांची भेट घेतली. त्यानंतर शाळांना नोटीस बजावण्यात आली. पुण्यातील प्रेस्टीज पब्लिक स्कूल-शिवणे, ऑर्किड इंटरनशनल स्कूल-उंड्री, रोझरी स्कूल, आंबेडकर रोड-कॅम्प, मिलेनियम नॅशनल स्कूल-वारजे, रोझरी स्कूल-वारजे, विश्‍वशांती गुरुकुल एमआयटी- एसएससी बोर्ड -पौड रोड, कोथरूड, पीयुएस मेमोरिअल हायस्कूल-चाकण या शाळांचा समावेश आहे.

कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण थांबणार नाही, याची दक्षता आपण घ्यावी. फी भरली नाही तसेच अन्य काही कारणे ज्यामध्ये मुलांची काही चूक नाही अशा कारणामुळे मुलांचे ऑनलाइन शिक्षण थांबणार नाही, असे नोटिसीत नमूद केले आहे. त्याप्रमाणे कार्यवाही न केल्यास शाळेवर कायदेशीर कारवाई करणेबाबत वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्तावित करण्यात येईल, असे शिक्षणाधिकाऱ्यांनी नोटीसीत म्हटले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.