वडूज आगारात विद्यार्थ्यांचा ठिय्या

वडूज  – वेळेत बस सोडत नसल्याच्या निषेधार्थ आज येथील महाविद्यालयिन विद्यार्थ्यांनी वडूज आगारात ठिय्या आंदोलन करत आगारातील सर्वच बसेस अडवल्या. अचानक झालेल्या या आंदोलनाने यावेळी प्रशासनाची तारांबळ उडाली होती. यावेळी नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाने आगार व्यवस्थापकांना चांगलेच धारेवर धरले.

याबाबत अधिक माहिती अशी बोंबाळे, ता. खटाव या गावाकडे जाणारी एसटीचे वेळापत्रक कोलमडून गेले असल्याने विद्यार्थ्यांना ताटकळत थांबावे लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासासह शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. याबाबत त्यांनी अनेक वेळा प्रशासनाला याची कल्पना दिली होती.

मात्र आगार व्यवस्थापकांकडून कोणतीच दखल घेतली जात नसल्याने आज महाविद्यालयातील डाभेवाडी, बोंबाळे, डाळमोडी, निसळबेंद गावच्या विद्यार्थ्यांनी आज थेट वडूज आगाराकडे मोर्चा वळविला. व त्याठिकाणी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले.

दरम्यान, नगरसेवक शहाजीराजे गोडसे मित्र मंडळाचे शहाजीराजे गोडसे, विजयदादा शिंदे, लालासो गोडसे, मधुकर मोहिते ,विक्रम गोडसे यांच्यासह अनेक पदाधिकारी याठिकाणी आंदोलनात सहभागी झाले. या प्रकाराबाबत प्रशासनास जाब विचारत कारभार सुधारण्यास सांगितला. वेळीच कारभारात सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला. सुमारे तासभर सुरू असलेल्या या आंदोलनामुळे वडूजहुन जाणाऱ्या बस सेवा ठप्प झाली होती. काही बसेस आगारातच अडकुन पडल्या होत्या. तर अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्यातील चर्चेनंतर ही बस सुरू करून आंदोलन मागे घेण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)