दहावीची परीक्षा संपताच विद्यार्थ्यांचा जल्लोष

खटाव – राज्यभर सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षा अखेर आज संपल्या. यामुळे अभ्यासाचा एकदाचा ताण संपल्याने विविध शाळेचे विद्यार्थी शाळेच्या आवारातून मैत्रिणीसह जल्लोषात बाहेर पडताना दिसत होते. एकंदरीत वातावरण पूर्णपणे टेन्शन फ्री झाल्याचे मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होते.

संपूर्ण महिना विद्यार्थी परीक्षेच्या प्रचंड तणावाखाली असल्याचं दिसून आले होते. आज शेवटच्या दिवशी हा तणाव कुठल्या कुठे गायब होऊन आपापल्या मित्र मैत्रिणीबरोबर जल्लोषात शाळेच्या आवारातून बाहेर पडताना दिसत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपण शालेय जीवनातील माध्यमिक शाळेचा एक टप्पा पार केल्याचा आनंद जाणवत होता. सर्व पेपर सोपे गेले, आपले काम आपण प्रामाणिकपणे केले. आता निकाल काहीही लागो, संपली एकदाची परीक्षा, आता दोन तीन महिने निवांत, कसलाही अभ्यासाचा ताण नाही.

आता अनेक गोष्टींचा आनंद लुटण्याचा राहिला तो पूर्ण करायचा. नातेवाईकांकडे जायचे आणि यातून वेळ मिळाला तर एमएससीआयटीचा कोर्स करायचा. अशा विविध प्रतिक्रिया दहावीच्या परीक्षा केंद्र परिसरात ऐकावयास मिळाल्या. तर केंद्र परिसर सोडताना सर्व विद्यार्थी आता आपण दोन ते तीन महिने भेटणार नसल्याने एकमेकांचे नियोजन जाणून घेण्यातही मग्न असल्याचे जाणवत होते.

Leave A Reply

Your email address will not be published.