पुणे – जिल्ह्यात करोना संसर्ग वाढू लागल्याने काही दिवस सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद झाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गणवेश खरेदीसाठी दिलेला निधीतून आताच खरेदी करू नये. हा निधी पुढील वर्षात वापरता येईल, अशा सूचना जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाचे सभापती व उपाध्यक्ष रणजीत शिवतरे यांनी दिल्या आहेत.
करोनामुळे आठ महिन्यांपासून बंद असलेल्या शाळा डिसेंबर अखेरपासून टप्प्याटप्याने सुरू झाल्या. दरम्यान, इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या लाभार्थी विद्यार्थ्यांना गणवेशासाठी समग्र शिक्षा अभियानांतर्गत अनुदान दिले जाते. यंदा 1 लाख 59 हजार 391 लाभार्थ्यांसाठी 4 कोटी 78 लाख 17 हजार 300 रुपये अनुदान मंजुर करून पाठविण्यात आले आहे.
जिल्हा परिषदेकडून हे अनुदान तालुक्यातील शाळा व्यवस्थापन समितीकडे पाठविण्यात आले. तर, गणवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेकडून 2 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
परंतु, फेब्रुवारीपासून पुन्हा करोनाने डोक वर काढल्यामुळे राज्य शासनाकडून सुरू झालेल्या शाळा पुन्हा बंद केल्या. ही परिस्थिती आणखीन किती दिवस राहील, याची कल्पना नाही. तोपर्यंत 2020-21 हे शैक्षणिक वर्ष संपेल. त्यामुळे एका गणवेशासाठी दिलेल्या निधीतून आताच खरेदी करू नये, याबाबत शिक्षण विभागाकडून शाळांना सूचना देण्यात आल्याचे शिवतरे यांनी सांगितले.
यंदाच्या शैक्षणिक वर्षात शाळा सुरू झाल्या नाही. एका गणवेशासाठी समग्र शिक्षा अभियानाकडून निधी आला आहे. मात्र, महिन्याभरातच शाळा पुन्हा बंद झाल्या. त्यामुळे या निधीतून पुढील वर्षी गणवेश खरेदी करण्यात यावे. तसेच जिल्हा परिषदेकडूनही पुढीलवर्षी वंचित मुलांच्या गणवेशासाठी जिल्हा परिषद निधी दिला जाईल.
– रणजित शिवतरे, उपाध्यक्ष व सभापती, जिल्हा परिषद पुणे