पिंपरी – अभ्यासाचा ताण सहन न झाल्याने दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शुक्रवारी सकाळी वाकड येथे घडली.कल्पना नारायण ऊर्फ प्रताप पाटील (वय 15, रा. वाघोली) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश स्वामी यांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना ही बीजीएस विद्यालयात दहावीमध्ये शिक्षण घेत आहे.
ती सज्जनगड कॉलनी, रहाटणी येथील आपली बहिण पल्लवी बिराजदार यांच्याकडे काही दिवसांकरिता आली होती. पल्लवी यांचे पती कामानिमित्त बाहेर गेले होते तर बहिण आंघोळीसाठी गेली होती. त्यावेळी कल्पना हिने छताच्या लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब पल्लवी यांच्या लक्षात येताच त्यांनी कल्पना यांना त्वरीत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच कल्पना यांचा मृत्यू झाला.कल्पना या दहावीला होत्या. तिला अभ्याक्रम जड जात असल्याने नैराश्य आले होते असे तिच्या नातेवाईकांनी वाकड पोलिसांना सांगितले. याबाबत अधिक तपास सुरू आहे.